
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या तिरट जुगाराच्या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून सातजणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एक लाख 67 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अरविंद भिंगारदिवे, सुनील पवार, पंकज व्यवहारे, योगेश भिंगारदिवे व योगेश कर्डिले यांचे पथक भिंगार कॅम्प परिसरात अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली, सोलापूर रोडलगत कोंबडीवाला मळा, सारसनगर येथील हॉटेल आरव्हीच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामाच्या आडोशाला काहीजण तिरट नावाचा जुगार खेळत आहे.
माहिती मिळाल्यानंतर पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी संशयित जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले. कारवाईदरम्यान बाबासाहेब बेरड (रा. दरेवाडी), संजय तडके (रा. कोठी स्टेशन रोड), भास्कर जगधने (रा. कोंबडीवाला मळा), संजय भिंगारदिवे (दरेवाडी), सुधीर शिंदे (रा. स्टेशन रोड), महादेव कराळे (अगडगाव) आणि राजू भिवा मोरे (आदर्शनगर, श्रीरामपूर) या सातजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 13 हजार 500 रूपये रोख रक्कम तसेच एक लाख 54 हजार रूपये किमतीचे चार वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण एक लाख 67 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.




