Saturday, May 25, 2024
Homeनगरगणेश उत्सवादरम्यान शासनाच्या मोहिमेस प्रतिसाद द्यावा

गणेश उत्सवादरम्यान शासनाच्या मोहिमेस प्रतिसाद द्यावा

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

यंदा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साजरा होणारा सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची सार्वजनिक गणेश मंडळांना मोठी संधी आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून प्रशासनास साथ व सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. महसूल प्रशासनाने सर्व नागरिकांचे मतदार कार्ड आधार कार्डशी संलग्न करण्याची मोहीम हाती घेतली असून सार्वजनिक मंडळांनी शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार छगन वाघ यांनी केले.

- Advertisement -

शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, प्रशासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत तहसीलदार वाघ बोलत होते. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी स्वागत व प्रास्तविक केले. यंदाच्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या विविध नियमांची माहिती देऊन शांतता समितीचे सदस्य व सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घ्यावयाच्या दक्षतेची माहिती दिली.

गणेश उत्सवात उत्कृष्ठ आरास व देखावे सादर करणार्‍या तसेच गणपती उत्सव व विसर्जन मिरवणुकीत शिस्तबद्ध कामगिरी बजावणार्‍या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रशासनाच्यावतीने पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे व त्यासाठी सर्व समावेशक निरीक्षण समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वाघ व पोलीस निरीक्षक पुजारी यांनी दिली.

वीज वितरण कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अतुल लोहारे, शहर उपअभियंता हरीश तायडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, प्रवीण बागुल, सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गट, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, विनोद मोहिते, अशोक आहुजा, सुनील रासने, रवी सुरवसे, अमोल घोलप, दत्ता फुंदे, एजाज काझी, हरिश भारदे, नवनाथ कवडे, मनीष बाहेती, बाळासाहेब डाके, सागर फडके, विजय देशमुख, आकाश सुपारे, विशाल महाजन, मनीष घुले, गणेश साळवे, जाकीर कुरेशी, आयुब पठाण, बाळासाहेब आव्हाड, आकाश वांढेकर आदींसह विविध सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. गुप्तवार्ता विभागाचे किशोर धाकतोडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या