Saturday, May 4, 2024
Homeनगरआव्हान-प्रतिआव्हानांनी ‘गणेश’ परिसर ढवळला !

आव्हान-प्रतिआव्हानांनी ‘गणेश’ परिसर ढवळला !

5 कोटी राहुरी कारखान्याला का दिले ? – डॉ. गोंदकर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गणेश कारखान्यामध्ये कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आ. बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे गणेश कारखाना सुरु करणार आहे. अडचणीतील गणेश कारखान्याचे 5 कोटी 6 लाख रुपये तत्कालिन संचालक मंडळाने राहुरी कारखान्याला का दिले? गणेश कारखान्याचा विखे पाटील कारखान्याशी करार संपल्यानंतर खा.सुजय विखे पाटील यांना त्या संचालक मंडळाने सह्यांचे अधिकार का दिले? असा सवाल परिवर्तन मंडळाचे ज्येेष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी केला.

- Advertisement -

श्रीगणेश कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोंदकर बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, माजी अध्यक्ष व जेष्ठ संचालक अ‍ॅड. नारायणराव कार्ले, ज्येष्ठ नेते शिवाजीराव लहारे, संचालक अनिल टिळेकर, नानासाहेब नळे, अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, संपत हिंगे, अलेश कापसे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

डॉ. गोंदकर म्हणाले, खा. विखे हे गणेश कारखान्याचे संचालक किंवा सभासदही नाही, असे असतानाही जेव्हा गणेश कारखाना आणि प्रवरा कारखान्याचा करार संपल्यानंतर जून 2022 नंतर संचालक मंडळाने खा. सुजय विखे यांना जे सह्यांचे अधिकार दिले, ते पूर्णता बेकायदेशीर आहे. प्रवरा सहकारी बँकेच्या माध्यमातून तत्कालीन संचालक मंडळाच्या काळाचे व्यवहार झाले त्या सर्व आर्थिक व्यवहारांवर खा.सुजय विखे यांच्या सह्या आहेत. त्यातल्या अनेक व्यवहारांची कागदपत्रे ही कारखाना रेकॉर्डमध्ये सापडत नाही.

डॉ. गोंदकर पुढे म्हणाले, राहुरी सहकारी साखर कारखाना हा सुद्धा विखे पाटील यांच्याच अधिपत्याखाली होता. या कारखान्याचे कोणतेही मागणी पत्र गणेश कारखान्याकडे नाही. गणेश कारखान्याचा राहुरी कारखान्याशी कोणताही संबंध नाही, असे असतानाही खा. विखे यांच्या सहीने राहुरी कारखान्याला 5 कोटी 6 लाख रुपये देण्यात आले. एवढी मोठी रक्कम राहुरी कारखान्याला कशासाठी दिली गेली? सहकार कायद्यानुसार संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय कोणत्याही इतर संस्थेला रक्कम दिली जाऊ शकत नाही.

अध्यक्ष लहारे म्हणाले, गणेश सहकारी साखर कारखान्याला प्रवरा कारखान्याच्या सांगण्यावरून कर्ज नाकारले गेले. जिल्हा बँक जर दुसर्‍या कारखान्याच्या देणेदारीवरून आम्हाला कर्ज नाकारत असेल तर आमचे सुद्धा राहुरी कारखान्याकडून 5 कोटी 6 लाख रुपये घेणे आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांची कारखान्या संदर्भातली भूमिका प्रामाणिक आहे. राजकारण करण्यापेक्षा कारखाना चालवण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे.

ते पाच कोटी 81 लाख जिल्हा बँकेने द्यावे

गणेश सहकारी साखर कारखान्याकडून राहुरी कारखान्याने घेतलेले पाच कोटी 81 लाख रुपये देण्याची जबाबदारी जिल्हा बँकेची आहे. राहुरी सहकारी साखर कारखाना सध्या जिल्हा बँकेच्या ताब्यात असून, जिल्हा बँकेने ही रक्कम तातडीने गणेशच्या खात्यावर वर्ग करावी, असे आवाहन गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी केले.

कराराप्रमाणे आर्थिक व्यवहार करा – तांबे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने केलेल्या सहकार्याची जाणीव गणेशच्या कामगारांना आहे. त्यामुळे कामगारांना राजकारणात आणि अर्थकराणात न ओढता कराराप्रमाणे सर्व अर्थिक व्यवहार गणेश कारखान्याने आधी पूर्ण करावेत, असे आवाहन पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी केले आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात तांबे यांनी म्हटले आहे, डॉ.विखे पाटील कारखाना आणि गणेश कारखान्यात झालेल्या पाच वर्षातील कराराच्या बाबतीत लवादापुढे काही निर्णय व्हायचे आहेत. याबाबत असलेले अर्थिक मुद्दे निकाली निघावेत हा प्रयत्न आहे. कारण ज्यांनी यापुर्वी कामगारांचे पैसे बुडवले ते डॉ. विखे पाटील कारखान्याचे पैसे बुडविण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे झालेल्या कराराप्रमाणे गणेशच्या संचालकांनी आधी व्यवहार पूर्ण करावेत. यासाठी डॉ.विखे पाटील कारखान्याने पत्र दिले आहेत. त्यामुळे गणेश कारखान्याचे कर्ज प्रकरण बॅकेने थांबवावे किंवा कर्ज प्रकरणाला विखे कारखान्याची हरकत असण्याचे कोणतेही कारण नाही.

गणेश कारखान्याला संगमनेर आणि संजीवनीचे नेते मदत करणार असल्याचे संचालक मंडळाकडून सांगितले जात असेल तर गणेश कारखान्याला कर्ज काढण्याची गरज काय असा प्रश्न तांबे यांनी उपस्थित केला. गणेश कारखाना 8 वर्ष चालविताना एकाही कामगाराचा पगार डॉ.विखे पाटील कारखान्याने थकविलेला नाही. पुर्वीच्या संचालक मंडळाने थकविलेले 27 महिन्यांचे पगार डॉ.विखे पाटील कारखान्याने केले याची जाणीव कामगारांना आहे. पाच वर्षांच्या कराराची मुदत वाढवून मिळाली असताना सुध्दा निवडणुकीनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठ्या मनाने गणेश कारखान्याचा करार रद्द करून आम्हाला कारखाना चालवायचा नाही ही भूमिका घेतली, त्यानंतर सर्व आर्थिक व्यवहार गणेशच्या संचालकांनी पूर्ण करायला हवे होते.

परंतू त्याचा कोणाताही ठराव न करता केवळ विखे पाटील यांना बदनाम करण्याचा डाव संचालक मंडळाचा दिसतो हे कामगार आणि सभासदांनी लक्षात घेतले पाहीजे. डॉ. विखे पाटील कारखान्याशी असलेला करार अद्यापही रद्द नाही. त्यामुळे गणेश कारखाना कर्ज कोणाच्या नावाने घेणार याची कोणती स्पष्टता कारखान्याचे संचालक करायला तयार नाहीत. यापुर्वी डॉ.विखे कारखान्याने तोटा सहन करून गणेश कारखाना चालवला, सभासद कामगारांचे हित जोपासले आहे. कारखाना चालविण्यातील अपयश उघड होवू लागल्याने कामगारांचा उपयोग करून संचालकांना राजकारण करणे सुचले हे अत्यंत दुर्दैवी आहे. या राजकारणात कामगारांना ओढू नये. संगमनेर आणि संजीवनीच्या मार्गदर्शकांकडे कर्ज काढून गणेश कारखाना चालविण्याचा आग्रह धरावा, असे आवाहन कैलास तांबे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या