Sunday, May 19, 2024
Homeनगरनवनिर्वाचीत संचालक मंडळाने ‘गणेश’ चालवावा

नवनिर्वाचीत संचालक मंडळाने ‘गणेश’ चालवावा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

गणेश कारखाना भाडेतत्वावर घेतलेल्या कराराची मुदत संपली असली तरी, कराराची मुदत वाढवण्याचा विखे पाटील कारखान्याचा अधिकार होता. मात्र गणेशच्या सभासदांचा कौल मान्य करून, नवनिर्वाचीत संचालक मंडळाने कारखाना चालवावा, आमच्या कराराची कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. गणेश कारखान्याकरीता सहकार्याचीच भूमिका राहील, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

गणेश कारखाना निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच शिर्डी येथे पत्रकारांशी बोलतांना ना. विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर उपस्थित होते.

साईबाबा संस्थानमध्ये ठेकेदारी पध्दतीने कर्मचारी भरण्याची पध्दत सुरू झाल्याच्या चर्चेने कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत काल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाशंकर यांच्या समवेत चर्चा झाली असून असा कोणताही प्रस्ताव नाही किंवा त्या पध्दतीचा अवलंब होणार नसल्याची ग्वाही संस्थानच्या वतीने देण्यात आल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

उत्सवाच्या निमित्ताने साईसेवक नेमले जातात. त्यांचे कामही मर्यादीत कालावधीसाठी असते. याचा परिणाम सध्याच्या कर्मचार्‍यांवर होणार नाही. तशी अंमलबजावणी करण्याचा संस्थानचा मानस असल्याकडे लक्ष वेधून भोजनगृहाचा विस्तार करण्यासाठी शेती महामंडळाच्या जमीनीबाबत प्रस्ताव आल्यास त्याचा सकारात्मक विचार करणार असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

संस्थान मधील 598 कर्मचार्‍याच्या संदर्भात त्रिदस्यीय समिती असताना निर्णय होणे गरजेचे होते. परंतू यामागची भूमिका जाणून घेण्यापेक्षा त्याला बगल देण्याचा प्रयत्न झाला. परंतू राज्य सरकार या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही ना. विखे पाटील यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना, खासगी बस पार्कींग करीता जागा उपलब्ध करून देणार आहोत. या बरोबरीनेच साईबाबांच्या संदर्भात थीमपार्क क्रीडासंकुल आणि शिर्डी सुशोभीकरणातून धार्मिक वातावरण शहरात निर्माण करण्याचा प्रयत्न असून, या भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीच्या आराखड्याला लवकरच मूर्त स्वरूप येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या