Thursday, September 24, 2026
HomeनगरAhilyanagar : बाप्पाला निरोप देण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज!

Ahilyanagar : बाप्पाला निरोप देण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज!

सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर || तगडा पोलीस बंदोबस्त तैनात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर शहरासह जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे तीन हजार 312 लहान-मोठ्या सार्वजनिक व खासगी गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली असून उद्या (शुक्रवारी) अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे साडेतीन हजार पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगर शहरात पहिला मानाचा गणपती असलेल्या ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते श्री गणेशाची उत्थापन पूजा होऊन सकाळी 10 वाजता मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. माळीवाडा विशाल गणपती नंतर मानाची गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच स्थानिक दुकाने व इतर आस्थापनांच्या कॅमेर्‍यांची ही मदत मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी घेतली जाणार आहे. मिरवणूक मार्ग व त्या लगतच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी फिक्स पाईंटवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत. केडगाव उपनगर, सावेडी उपनगर परिसरातही अनेक मंडळे स्वतंत्र मिरवणुका काढणार आहेत.

जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. जिल्ह्यात तीन हजार 312 लहान-मोठ्या सार्वजनिक व खासगी गणेश मंडळांसह 255 गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेतून श्री गणेशाची स्थापना केली आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, कोपरगाव, जामखेड या प्रमुख शहरासह ग्रामीण भागातील छोट्या- मोठ्या मंडळातील श्री गणेशाचे उद्या विसर्जन केले जाणार आहे. संबंधीत पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

डीजे व लेझरला मनाई
गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणासह अन्य नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. प्लाझ्मा-लेझरचा वापर करू नये तसेच मोठ्या आवाजातील डीजे न वाजवता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचा भंग करून ध्वनी प्रदूषण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

623 गुन्हेगार हद्दपार
विसर्जन मिरवणुकीच्यावेळी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच भारतीय न्याय संहिता कलम 163 नुसार 623 गुन्हेगारांना विसर्जन मिरवणुकीच्या काळात हद्दपार करण्यात आले आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे.

जिल्ह्यासाठी बंदोबस्त
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 10 पोलीस उपअधीक्षक, 25 पोलीस निरीक्षक, 200 सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, 2200 पोलीस कर्मचारी, होमगार्ड, एसआरपीएफची एक तुकडी, क्यूआरटीच्या दोन तुकड्या, स्ट्रायकिंग फोर्स 10, साध्या वेशातील पोलिसांची पथके, छेडछाड विरोधी पथक, ध्वनी प्रदूषण पातळी मोजण्यासाठी स्वतंत्र पथक असणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा सभापती शिंदेंना अधिकारच नाही

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेत असले तरी, मुळात त्यांना ही निवडणूक...