अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणासह अन्य नियमांचे पालन करावे. प्लाझ्मा-लेझरचा वापर करू नये तसेच मोठ्या आवाजातील डीजे न वाजवता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचा भंग करून ध्वनी प्रदूषण करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला.
14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून, अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाचे स्वागत करताना अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत तसेच कमी आवाजातील साऊंड सिस्टीमचा वापर करीत पोलिसांना सहकार्य केले. आता गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू झाली असून, 25 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजातील डीजे, प्लाझ्मा-लेझर आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा यावर्षी अधिक चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, मंडळांचे प्रमुख तसेच डीजे चालक व मालक यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये मिरवणुकीदरम्यान डीजेचा वापर करू नये, प्लाझ्मा-लेझर बंद ठेवावेत तसेच ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणार्या उपकरणांचा वापर टाळावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तशा नोटीसा संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असल्याने मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवावे, असे आवाहन अधीक्षक सुदर्शन यांनी केले आहे. ढोल-ताशे, लेझीम तसेच अन्य पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करताना ध्वनी मर्यादांचेही पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मोठ्या आवाजातील डीजेमुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे डीजेच्या वाढत्या आवाजाबाबत नागरिकांमधूनही चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक सुदर्शन यांनी केले आहे.
विसर्जन मिरवणुकीत उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करणे प्रत्येक मंडळाची आणि संबंधितांची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजविणे किंवा प्लाझ्मा-लेझरचा वापर करणे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अधीक्षक सुदर्शन यांनी दिला आहे.




