Friday, September 25, 2026
HomeनगरAhilyanagar : गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू; भिंगारमध्ये तणाव

Ahilyanagar : गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू; भिंगारमध्ये तणाव

सखोल चौकशीच्या आश्वासनानंतर 18 तासांनी गणरायांना निरोप || घटनेची चौकशी अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांच्या मार्फत होणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार मधील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुक्लेश्वर तरूण मंडळाचे कार्यकर्ते दीपक रामकिसन वाघस्कर (वय 50, रा. वाघस्कर मळा, भिंगार) यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला तणाव अखेर गुरूवारी (24 सप्टेंबर) निवळला. पोलीस प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 18 तास रखडलेले भिंगारमधील गणेश विसर्जन सायंकाळी पार पडले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण घटनेचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असून, विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याच्या मागणीबाबतही शासनाला अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी दिली.

- Advertisement -

बुधवारी (23 सप्टेंबर) रात्री 15 गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी वाघस्कर बेशुध्द पडले. त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या लाठीमारामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. आमदार संग्राम जगताप यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केले. वाघस्कर यांच्या मृत्यूनंतर चार मंडळांनी विसर्जन थांबविले. गुरूवारी भिंगार बंद ठेवून पाथर्डी रस्त्यावर रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर आमदार जगताप व पोलीस प्रशासनाच्या बैठकीत चौकशी आणि कारवाईचे आश्वासन देण्यात आले.

दरम्यान, घटनेची चौकशी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्फत होणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत भिंगार पोलीस ठाण्याच्या प्रभारी एपीआय तेजश्री थोरात तसेच चार अंमलदारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. वाघस्कर यांच्या मृत्यूचा तपास पोलीस ठाणे स्तरावर न करता तो स्थानिक गुन्हे शाखेमार्फत केला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या प्रकरणाचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असून संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. वाघस्कर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सौम्य लाठीमार झालेल्या ठिकाणी वाघस्कर उपस्थित नव्हते. मात्र, या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर यामागील सत्य समोर येणार आहे.

भिंगारच्या गणरायांचे 18 तासांनंतर अखेर विसर्जन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार येथे बुधवारी (23 सप्टेंबर) रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या घटनेत दीपक रामकिसन वाघस्कर (वय 50, रा. वाघस्कर मळा, भिंगार) यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 18 तासांपासून रखडलेले भिंगारमधील गणेश विसर्जन अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर गुरूवारी (24 सप्टेंबर) सायंकाळी पार पडले. वाघस्कर यांच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, घडलेल्या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करण्याबाबतही शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी दिली.

वाघस्कर यांच्या मृत्यूची चौकशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील घटनाक्रम, त्यामागील परिस्थिती तसेच मृत्यूशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जाणार आहे. चौकशी निष्पक्षपणे व्हावी, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात बुधवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. या मिरवणुकीत एकूण 15 मंडळे सहभागी झाली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीदरम्यान गोंधळ उडाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. या दरम्यान शुक्लेश्वर तरूण मंडळाचे कार्यकर्ते दीपक वाघस्कर हे बेशुध्द पडले. त्यांना तातडीने अहिल्यानगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. याचवेळी मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी रूग्णालयात गर्दी केली. आमदार संग्राम जगताप हे देखील तेथे दाखल झाले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर दीपक यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. यामुळे तणाव निर्माण झाला. आ. जगताप यांनीदेखील पोलिसांवर गंभीर आरोप केले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे तसेच काही अधिकारी व अंमलदारांनी जाणीवपूर्वक मिरवणुकीत लाठीमार केल्याचा आरोप त्यांनी केला. गुरूवारी भिंगार बंदचे आवाहन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत एकूण 15 मंडळे सहभागी झाली होती. वाघस्कर यांच्या मृत्यूनंतर चार मंडळांनी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता. गणपती असलेली वाहने रस्त्यावर आणून लावण्यात आली होती. गुरूवारी दुपारी रस्तारोको आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

भिंगारमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी आ. जगताप आणि पोलीस प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत वाघस्कर मृत्यूप्रकरणी चौकशी, संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांवरील कारवाई, शासनाला अहवाल तसेच एसआयटी चौकशीच्या मागणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर भिंगार बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तब्बल 18 तासांपासून रखडलेले गणेश विसर्जन सायंकाळी पार पडले.
दरम्यान, दीपक वाघस्कर यांच्या मृतदेहाचे येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या मृतदेहाचा इनक्वेस्ट पंचनामा करण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

भिंगारमध्ये बंद
दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूप्रकरणी भिंगार परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या निषेधार्थ भिंगारमधील गणेश मंडळांनी गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेत गुरूवारी भिंगारमध्ये बंद पाळला. मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी भिंगारमध्ये पाथर्डी रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. आ. जगताप हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले.

एपीआय व अंमलदार सक्तीच्या रजेवर
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या घटनेची चौकशी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत भिंगार पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात तसेच संबंधित कर्मचार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये चार अंमलदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

व्हिडिओवरून गैरसमज पसरल्याचा दावा
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भिंगार परिसरात दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाल्यानंतर लाठीमाराच्या व्हिडिओवरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनेबाबत माहिती देताना, ज्या ठिकाणी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला, त्या ठिकाणी दीपक वाघस्कर उपस्थित नसल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली हलत असल्याने त्यावरील मुलांना खाली उतरविण्यासाठी त्यांच्या पायावर सौम्य लाठीमार करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Shrirampur : बेलापूर येथे तीन डीजे मालकांवर गुन्हे दाखल

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत नियम धाब्यावर ठेऊन नागरिकांना त्रास होईल अशा कर्णकर्कश आवाजात लेजर लाईटच्या वापरासह गाणी वाजविणार्‍या...