Friday, November 22, 2024
Homeनगरगणेशोत्सव शांततेच्या वातावरणात साजरा करा

गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात साजरा करा

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आढावा बैठकीत आवाहन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात गणेश उत्सवाची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कुणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, डीजे वाजविताना आवाजाचे ठराविक लिमीट असावे आदी सूचना करून सर्वांनी गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस पाटील, शांतता कमेटी सदस्य यांची येथील प्रशासकीय इमारत येथे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. लहू कानडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, नितीन दिनकर, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

याप्रसंगी राकेश ओला म्हणाले, गणेशोत्सव काळात शहरात मोकाट जनावरे फिरू नये म्हणून त्यांच्या मालकांना नोटिसा द्या, फ्लेक्स बोर्ड विनापरवानगी लावले असेल तर संबंधितावर कारवाई करा, छत्रपती शिवाजी रस्त्यावरील पार्किंग समस्या गंभीर झाल्या असल्याने पोलिसांनी बँका, ऑफिस, कार्यालये यांना नोटिसा देवून हा प्रश्न निकाली काढावा, रस्त्यावर पट्टे मारून काही दिवस कडक कारवाई करावी, नॉर्दन ब्रँचवर वीज व्यवस्था करावी, लहान मुलांची काळजी घ्यावी तसेच बोगस अफवा पसरवणारे तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

आ. लहू कानडे म्हणाले, धार्मिक उत्सवाच्या काळामध्ये राजकीय उन्माद वाढू शकेल, त्याची काळजी घ्यावी. शहरी भागातील मंडळांबरोबरच ग्रामीण भागातील मंडळांनी सुध्दा गणेशोत्सव काळात काळजी घ्यावी, त्या काळात वीजप्रवाह खंडित होऊ नये म्हणून महावितरणच्या अधिकार्‍यांनी काळजी घ्यावी, नगरपालिका बाबत जास्त प्रश्न आले आहेत, मुख्याधिकारी यांनी त्याकडे लक्ष द्यावे, कर्णकर्कश डिजेवर नियंत्रण ठेवावे, मोकाट जनावरांच्या मालकांवर नगरपालिकेने कारवाई करावी, छत्रपती शिवाजी रस्त्यावर पार्कींगची समस्या मोठी आहे, पोलिसांनी तसेच नगरपालिकेने याविरोधात संयुक्त कारवाई करावी, कायदा मोडणार्‍यांवर कडक कारवाई करावी, कायद्याच्या चौकटीत राहून 12 वाजेपर्यंत मंडळांना परवानगी द्यावी, अशा सूचना आ. कानडे यांनी केल्या.

मुख्याधिकारी सोमनाथ जाधव म्हणाले, शहरातील मोकाट जनावरांबाबत निरंतर कारवाई सुरू आहे. पथदिव्यांबाबत लवकरच कार्यवाही करू, गणेश मूर्ती विसर्जनाच्या बाबतीत सर्वांच्या भावनांचा आदर राखून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. भाजपाचे नितीन दिनकर म्हणाले, गणेशोत्सव मंडळांना वेगवेगळ्या परवानग्यांसाठी एकच फॉर्म असावा, महिलांची सुरक्षितता महत्वाची आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घ्यावी. माजी नगरसेवक रवी पाटील म्हणाले, शिवशिल्प जवळ फ्लेक्स बॉर्डला परवानगी देऊ नये, सीसीटीव्हीसाठी 1.5 कोटींचा निधी आलेला होता त्याचे काम व्हावे, घाट सुशोभीकरणाच्या निधीतून घाट दुरुस्ती व्हावी आदी सूचना त्यांनी केल्या. याप्रसंगी नागेश सावंत, नरसाळीचे प्रतिक राजुळे, रमाताई धिवर, अहमदभाई जहागीरदार, रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, रुपेश हरकल आदींनी गणेशोत्सव काळात घ्यावयाची काळजी याबाबत सूचना केल्या. प्रास्तविक पोलीस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या