अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आजपासून सुरू होत असलेल्या श्रींच्या उत्सावाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून नगरकर लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दरम्यान, रविवारपासून नगरच्या बाजारपेठ उत्साहाचे वातावरण असून मंगळवारी सायंकाळी शहरात गणेशोत्सावच्या खरेदीसाठी उच्चांकी गर्दी झालेली दिसून आली. शहरात जागोजागी पुजा साहित्याचे दुकाने, श्रींच्या मुर्ती विक्रेत्या स्टॉल, विविध खाद्यपदार्थ फळविक्रेते यांच्यामुळे गर्दीत वाढ झाली होती. यामुळे पुढील दहा दिवस नगरमध्ये आनंद उत्सवच साजरा होणार असल्याचे चित्र होते.
शहरातील माळीवाडा, चितळे रस्ता, गंजबाजार, प्रोफेसर चौक, पाईपलाइन चौक, भिस्तबाग, केडगाव, अंबिकानगर, कल्याण रस्ता या ठिकाणी गणेश मूर्ती, सजावटीचे साहित्य, रोषणाई, फुलांचे हार व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील प्रमुख चौक, रस्ते, वसाहती आणि गणेश मंडप सजावटीने उजळून निघाले असून गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी तीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. गणरायांच्या स्वागतासाठी सुरू असलेल्या या तयारीमुळे शहरासह घरोघरी उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सजावटीच्या साहित्यामध्ये विविध आकारातील मखर, लाईटच्या माळा, फुलांच्या माळा बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात मखरच्या किमती देखील वाढल्या आहेत. 200 ते 5 हजार रुपयांपर्यंत मखर विविध आकार व आकर्षक पद्धतीने उपलब्ध आहे. यंदा श्रीच्या मूर्तीच्या किमतीमध्ये 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. शाडू मातीच्या मुर्त्यांना मोठी मागणी आहे. पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यावर यंदा नगरकरचा प्रयत्न आहे.
महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेस प्रतिसाद देत शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत शहरातील 10 हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये शाडू मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. शहरातील शेकडो शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी महानगरपालिका व पर्यावरणदूत, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळांमध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवल्या. उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या उपक्रमाला विश्वविक्रमासाठी नामांकन मिळाले आहे. महानगरपालिकेच्या वतीने सर्व शाळांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
उत्सवाला निवडणुकीची झालर
नगरमध्ये पुढील काही महिन्यांत मनपा निवडणूक होणार असून या निवडणुकीची झालर या यंदाच्या गणेश उत्सवात दिसून आली. यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळाची संख्या वाढतांना दिसत आहे. यंदाच्या उत्सवात अनेक भावी नगरसेवक समोर येत्यांना दिसत आहेत. यामुळे उत्सवसातील रंगत आणि स्पर्धा वाढली आहे. यंदा देखील अनेक मंडळाकडून देखावे सादर करण्यात येणार असून उत्सवातील पाचव्या दिवसानंतर खर्याअर्थाने देखावे खुले होणार असल्याचे सांगण्यात आले.
एसपींच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा
गणेशोत्सवानिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात आज (27 ऑगस्ट) गणेश चतुर्थी दिनी सकाळी 9.15 वा. मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते श्रींची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होईल. गणेशोत्सवात 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी दिली. 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन दिनी सकाळी 8.30 वा. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते उत्थापन पूजा करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात येईल. गणेशोत्सवानिमित्त 10 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भविकांच्या सोयी-सुविधांसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही अॅड.आगरकर यांनी सांगितले.




