सोनई |वार्ताहर| Sonai
सोनई जवळील गणेशवाडी येथील डौले वस्तीवर हातात बेडी घालून मारहाण करत चोरीचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नेवासा पोलीस ठाण्याच्या फरार झालेला कर्मचारी किरण शिवाजी काटे याला सोनई पोलिसांनी शनिवार दि. 12 रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
किशोर डौले यांना गणेशवाडी येथे चोरीचा बनाव करून बेडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अधिकचा तपास करत व पुरवणी जबाब घेऊन त्यात नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी किरण शिवाजी काटे याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात 27 जून 2023 रोजी गु र नं 24/23 भादंवि कलम 307,452,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून आरोपी फरार झाला होता व न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होता.
सोनई पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी एक पथक रवाना केले होते. शनिवारी सोनई पोलिसांनी आरोपी काटे यास अटक करून नेवासा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार दि. 14 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.