Saturday, September 28, 2024
Homeक्राईमशेवगावात दरोडा टाकणारी नेवाशाची टोळी गजाआड

शेवगावात दरोडा टाकणारी नेवाशाची टोळी गजाआड

एलसीबीची कामगिरी || उस्थळला मेडिकल फोडल्याची दिली कबुली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेवगाव शहरात दरोडा व चांदगाव उस्थळ दुमाला (ता. नेवासा) येथील मेडिकल फोडणारी नेवासा तालुक्यातील गुन्हेगारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. पाच जणांचा यामध्ये समावेश असून त्यांच्याकडून 13 ग्रॅमचे दागिने, रोख रक्कम, चाकु असा एक लाख 85 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले (वय 40), रोहन अनिल ऊर्फ यासीनखॉ भोसले (वय 19, दोघे रा. गोंडेगाव, ता. नेवासा), अमर दत्तु पवार (वय 30), कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले (वय 21 दोघे रा. नेवासा फाटा, ता. नेवासा), सुनील बाबाखॉ भोसले (वय 21, रा. गोंडेगाव, ता. नेवासा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

त्यांचा साथीदार दीपक इंदर भोसले (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) हा पसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. 8 जून रोजी दीपक बाबासाहेब जरांगे (रा. मारवाडी गल्ली, ता. शेवगाव) यांच्या घरात सहा जणांनी प्रवेश करून चाकुचा धाक दाखवून मारहाण केली. सोन्या – चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एक लाख आठ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. तसेच निवृत्ती कारभारी वाणी (रा. सातपुते गल्ली, शेवगाव) यांच्या घरात चोरी करून एक लाख 40 हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले होते. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.

त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. पथकाने घटना ठिकाणी भेट दिली असता सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने संशयित आरोपींविषयी काहीच माहिती मिळाली नाही. पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव) याने साथीदारांच्या मदतीने केल्या असून तो त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याचे घर गाठले असता अनिल भोसले व रोहन भोसले यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता इतर साथीदार अमर पवार, कृष्णा भोसले, दीपक भोसले व सुनील भोसले यांच्यासोबत शेवगाव व एक महिन्यापूर्वी चांदगाव उस्थळ दुमाला परिसरातील मेडीकल फोडुन रोख रक्कम व पल्सर मोटारसायकल चोरी केल्याची कबूली दिली. पथकाने इतर साथीदारांचा शोध घेतला असता अमर पवार, कृष्णा भोसले, सुनील भोसले यांना ताब्यात घेतले. दीपक भोसले पसार झाला आहे. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता शेवगाव पोलीस ठाण्यातील दरोडा व नेवासा पोलीस ठाण्यातील अनिल गोरक्षनाथ उंदरे (रा. उस्थळ दुमाला) यांचे मेडिकल फोडल्याचा दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

चौघांवर 26 गुन्हे
अनिल भोसले विरोधात नगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, आर्म अ‍ॅक्ट व दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत. अमर पवार विरूध्द नगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, आर्म अ‍ॅक्ट, दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकुण 14 गुन्हे दाखल आहेत. रोहन भोसले विरोधात दरोड्याचा एक तर सुनील भोसले विरोधात चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या