माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात ट्रकाच्या ट्रका सामान बाहेरून येते हा गैरसमज आहे. येतात हे खरे असून हा ट्रकामधील माल कुणी दानशूर पाठवत नसून सप्ताह कमेटीने खरेदी केलेला किराणा माल सप्ताहाची व्याप्ती मोठी असल्याने ट्रकाने खाली होत असतो, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र गोदाधाम सरालाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. बाजाठाण,देवगाव शनी,चेंडुफळसह पंचक्रोशी सात गावाच्यावतीने रामेश्वर मंदिर गोदातिरी देवगाव शनी शिवारात 180 एकर जमीन क्षेत्रावर होणार्या 178 व्या सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या जागा पाहणी प्रसंगी सप्ताह कमेटीसह पंचक्रोशीतील वर्गणीदार भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या सप्ताह जागा पाहणी प्रसंगी रामदरबार आश्रमाचे हरिशरण महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, जि.प.अर्थ, बांधकाम समितीचे माजी सभापती अविनाश गलांडे, डॉ.प्रकाश शेळके, यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती. सायंकाळी 6 वाजता महंत रामगिरी महाराज यांचे आगमन झाल्यानंतर प्रथम इच्छापूर्ती रामेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दर्शनानंतर पंचक्रोशीतील देवगाव शनी, बाजाठाण, चेंडुफळसह हमरापूर, अवलगाव, नागमठाण, कमालपूर भामाठाण, खानापूर, पीरवाडी, नेवरगाव, वाहेगाव आदी गावांतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत जागेची पाहणी केली.
योगायोगाने शनिवार असल्याने शनैश्वर मंदिरात महंत रामगिरी महाराज व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. याप्रसंगी उपस्थित हजारो महिला पुरुष भाविकांना पुढील 178 व्या सप्ताहाविषयी मार्गदर्शनपर उपदेश करताना महाराज म्हणाले की, सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेल्या प्रथेप्रमाणे सप्ताहाचा नारळ आषाढ वद्य एकादशीला श्रीक्षेत्र पुणतांबा येथे दिला जातो. सप्ताहाच्या पूर्व तयारीसाठी कमीतकमी सहा महिने लागतात म्हणून नारळाचे नियोजीत ठिकाण पाहणी निश्चित केली जाते. सप्ताहाची संपूर्ण जबाबदारी पंचक्रोशीतील गावांसह सप्ताह कमेटीच्या खर्चातून असते.
त्याकरिता श्रेयासाठी समोर येऊन श्रमदान, सहकार्य करणारापेक्षा पाठीमागे राहुन श्रम करणारा सर्वोत्कृष्ट कार्य करतो.आपण पेरणी करताना बी उघड्यावर पडले. तर पाखरं खातात किंवा उन्हाने तळपून जाते. पेरणीत बी मातीआड झाले तर अंकुर फुटून एका बीजापासून शेकडो दाने तयार होतात. असेच सप्ताह देणगी, अथवा दानधर्म झाकून केल्यास प्रपंचातील धन अंकुराप्रमाणे बहरते.सप्ताह कमेटीने पावसाळ्यापूर्वी मैदान (मुरुमीकरण) सपाटीकरण, पार्किंग जागा साफसफाई पूर्ण करावी. ही कामे अगोदर पूर्ण केल्यास पावसाळ्यात पुढील कामासाठी वेळ मिळतो. आपल्या पंचक्रोशीतून ज्या ज्या साखर कारखान्यांस ऊस पुरवठा होतो .त्या कारखान्यांची मदत आपणास मिळणार असल्याचे महाराज म्हणाले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार रमेश बोरनारे म्हणाले की, या सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोनवेळा पार पाडलेली आहे. या सप्ताहात काहीच कमी पडणार नाही. याचा अनुभव मला आहे. सप्ताह परिसरातील रस्ते, कमालपूर केटीवेअर दुरूस्तीसह सप्ताहात जे जे कमी पडेल ते ते देण्याची जबाबदारी आपण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आ.भाऊसाहेब चिकटगावकर, अविनाश गलांडे, हरिशरण महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पंचक्रोशीतील गावोगावच्या प्रमुख पदाधिकार्यांसह श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेटाचे हजारो भक्तगण उपस्थित होते. राजेंद्र मेघळे यांनी सुत्रसंचालन केले. शनैश्वर आरतीनंतर अनुपाटील मेघळे परिवाराच्यावतीने महाप्रसाद पगंत देण्यात आली.
सप्ताह परपंरेत सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी गवंडगावच्या सप्ताहात वरखेडचा नारळ सुपूर्द केला
गवंडगांवच्या सप्ताहात वरखेडचा नारळ सुपूर्द केला पुढील नियोजीत सप्ताहाच्या नारळावरून कधीही वाद अथवा नाराजी झालेली नाही. सप्ताह मागणीनुसार अगोदर कुणाला नारळ द्यायचा निश्चित झाल्यानंतर पूर्वतयारीच्या सूचना पंचक्रोशीतील गावांना दिल्या जातात. प्रथेप्रमाणे पुणतांबा येथे नारळ दिला जातो. अंतर्यामी महापुरूषाला आपला वैकुंठवासाचा काल समजतो म्हणूनच की काय त्यांनी काल्याच्या किर्तनातच वरखेडच्या ग्रामस्थांना सप्ताहाचा नारळ सुपूर्द केला. गवंडगाव (ता.येवला) येथील 2008 मधील सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या अधिपत्याखालील अखेरचा सप्ताह. अन् 2009 मधील वरखेडचा उत्तराधिकारी रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखालील पहिला सप्ताह होय. मार्गदर्शन करताना महंत रामगिरी महाराजांनी गुरूच्या प्रसंगाची आठवण करून दिली त्यावेळी समोरील भक्तगण भावूक झाले होते.