राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
काल दिवसभर दारणा, भावलीच्या घाटमाथ्यावर पावसाची बॅटींग सुरुच होती. गंगापूर धरणात गुरुवारी सकाळी 62.38 टक्के पाणीसाठा होता. मुकणे 57.67 टक्के असा साठा आहे. दारणातील विसर्ग 4826 क्युसेकने सुरू होता तर नांदूरमधमेश्वरचा विसर्ग काहीसा घटवून तो 3955 क्युसेक इतका करण्यात आला होता.
गुरुवारी दिवसभरात घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे नवीन पाण्याची आवक वाढणार आहे. काल सायंकाळी 5 वाजता दारणाचा विसर्ग 4205 क्युसेकने सुरू होता. त्या अगोदर दुपारी 3 वाजता तो 3584 क्युसेक इतका होता. रात्री 9 वाजता त्यात वाढ करून तो 4826 क्युसेक करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य टिकून असल्याने दारणात पाण्याची आवक सुरू आहे.
काल सकाळी 290 दलघफू नवीन पाणी मागील 24 तासात दारणात दाखल झाले. भावलीतून 290 क्युसेकने विसर्ग सांडव्यावरुन सुरु होता. तो दारणात दाखल होत आहे. 77.94 टक्के पाणी स्थिर ठेवून नवीन दाखल होणारे पाणी विसर्गाच्या रुपात सोडले जात आहे. काल सकाळपर्यंत मागील 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 6 मिमी, पाणलोटातील इगतपुरी येथे 47 मिमी पाऊस झाला पडला. घोटी भागातही हिच परिस्थीती होती. भावलीला 58 मिमीची नोंद झाली. भावलीत 24 तासात 29 दलघफू पाणी नविन दाखल झाले. मुकणेत 72 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. मुकणे 57.67 टक्के भरले आहे. वाकीत 31.58 टक्के, भाममध्ये 68.91 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 32.39 टक्के.
गंगापूर धरणात काल सकाळी मागील 24 तासात 190 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 5630 क्षमतेच्या गंगापूरमध्ये 62.38 टक्के पाणीसाठा आहे. गंगापूरच्या परिसरात 30 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपी 34.61 टक्के, गौतमी गोदावरी 35.60 टक्के, कडवात 45.20 टक्के, आळंदी 21.81 टक्के असे पाणी साठे आहेत.
नांदूरमधमेश्वर बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 3955 क्युसेकने विसर्ग सुरु होता. त्यात आज सकाळी वाढ झालेली असेल. या बंधार्यातून गोदावरीत जवळपास दोन टिएमसी पाण्याचा विसर्ग 1 जून पासून झाला आहे.