अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गंजबाजार येथील सोन्याच्या दुकानातून तब्बल 4 लाख 80 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या बंगाली कारागीरासह चौघा संशयित आरोपींना कोतवाली पोलिसांनी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतले आहे. पोलीस कोठडी रिमांड दरम्यान गुन्ह्यातील 71 ग्रॅम सोन्याचे दागिने, हस्तगत करण्यात आले आहेत.
दि. 16 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15 ते 1.30 वाजताच्या सुमारास फिर्यादी रमजान सलाम पियादा (रा. धरती चौक, अहिल्यानगर) हे बाहेर गेले असता त्यांच्या दुकानातील बंगाली कारागीर अरमान अली कुरबानअली शेख (रा. हुगली, पश्चिम बंगाल) याने संधी साधून 93 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले. यात पाच नेकलेस, पट्टी गंठण आणि चार जोड पळ्या असा मुद्देमाल होता. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी गुन्हे शोध पथकाच्या मदतीने मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण तसेच माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला.
चौकशीत अरमान अली शेख याने आपले साथीदार नझरूल नुर हुसैन, आसिफ खलील शेख आणि सराफ व्यवसायिक अब्दुलनसीम शेख यांच्याकडे काही दागिने विक्री केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या परवानगीने तपास पथक पश्चिम बंगालमधील हुगली व बर्धमान जिल्ह्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अहिल्यानगर येथे आणले. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान संशयित आरोपींच्या नातेवाईकांनी घरी ठेवलेले दागिने पंचासमक्ष जमा केले.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक निरीक्षक थोरात, सहाय्यक निरीक्षक गणेश देशमुख, तसेच पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, विनोद बोरगे, सलीम शेख, विशाल दळवी, सूर्यकांत डाके, विक्रम वाघमारे, संदीप पितळे, सत्यजित शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, महेश पवार, अतुल कोतकर, शिरीष तरटे, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने ही कामगिरी केली.





