Tuesday, March 25, 2025
HomeUncategorizedआतुरता बाप्पाच्या आगमनाची

आतुरता बाप्पाच्या आगमनाची

हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात. गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे.

कुठल्याही मंगल कार्याची सुरूवात करतांना गणपतीचे पूजन करून केली जाते. गणपती सर्व संकट नाशक, सुखकारक आणि विद्येची देवता आहे. विद्येतील सर्व संकटे हरन करणारा आहे. म्हणून विद्या ग्रहण करणे सुरू करण्यापूर्वी गणपतीची उपासना केली जाते. म्हणूनच गणपतीला विद्येचा अधिष्ठाता म्हटले जाते. गणपती ही सर्वांचे कल्याण करणारी, सकल जनांना आशीर्वाद देणारी देवता आहे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीस गणपतीचे वाजत गाजत आगमन होत दहा दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण पहावयास मिळते.

- Advertisement -

सर्वांनाच अगदी हवाहवासा वाटणार्‍या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशाचे वर्णन अजन्म्, निर्विकल्पं, निराकार रूपम् असे केले जाते. तो अजन्म् आहे म्हणजेच ज्याचा जन्म झाला नाही असा, तो निराकार आहे म्हणजेच आकार रहित आहे आणि निर्विकल्प म्हणजेच विकल्प नसलेला असा आहे. तो सर्वत्र असलेल्या चेतनेचे प्रतिक आहे. गणेशामुळेच हे ब्रह्मांड आहे.

ज्याच्यामुळे सर्व गोष्टींना आकार मिळतो आणि अशी ऊर्जा आहे ज्यात सारे विश्व सामावलेले आहे. गणेश बाहेर मूर्तीत नसून तो आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. पण हे अतिशय सूक्ष्म ज्ञान आहे. प्रत्येक निराकार गोष्ट साकार रूप घेऊ शकत नाही हे आपल्या प्राचीन ऋषी मुनींना माहित होते. सामान्य जनतेला हे समजावे म्हणून त्यांनी त्या निराकार श्रीगणेशाला साकार रूप दिले. बराच काळ साकार रूपाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना निराकाराचा अनुभव येऊ लागतो.

गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनी सुरू होईल. तर भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 22 मिनिटांनी समाप्त होईल. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाही आपल्यासोबत शुभ रवियोग घेऊन येत आहेत. या योगाबद्दल असे म्हटले जाते की, या योगामध्ये सर्व अशुभ योगांचे प्रभाव नष्ट करण्याची क्षमता आहे. म्हणजेच सर्व अडथळे दूर करून भक्तांना प्रसन्न करण्यासाठी विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन होत आहे. गणपतीची स्थापना करण्यासाठी सुमुहूर्त आहे सकाळी 11 वाजून 24 मिनीटांपासून दुपारी 1 वाजून 54 मिनीटांपर्यंत. गणेशाची स्थापना करतांना पुढील मंत्रांचे अवश्य उच्चारण करावे.

अस्य प्राण प्रतिष्ठन्तु अस्य प्राणाः क्षरंतु च,

श्री गणपते त्वं सुप्रतिष्ठ वरदे भवेताम

गणेशपूजने कर्म यत् न्यूनमधिकम कृतम्

तेन सर्वेण सर्वात्मा प्रसन्न अस्तु गणपती सदा मम…

श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे. भाद्रपद महिन्यात पावसाचे दिवस असल्याने सगळीकडेच हिरवळ पसरलेली असते आणि विविध वनस्पती उगवलेल्या असतात. त्यामुळे सोळा पत्री श्री गणेशाला अर्पण करण्याची प्रथा असावी. या पत्रींमधे अधिकतर पत्री या औषधी असल्याचे आपल्याला आढळते.

शिवशंकरांच्या पूजेत बेलाच्या पानाला महत्त्व आहे. श्रीविष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानांना महत्त्व आहे; त्याचप्रमाणे गणपती पूजनात दुर्वांना अत्याधिक महत्त्व आहे. गणपती दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही.

पौराणिक कथेनुसार, एकदा यमाच्या दरबह्रारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या मनोभावना बोलून दाखवली. यावर, पण म्हणून माझे नृत्य थांबवून सगळ्या दरबाराच्या रंगाचा बेरंग कशाला, असे तिने रागाने विचारले. तेव्हा अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. त्याने हसून गडगडाट केला. हे यमधर्मा, माझे नाव अनलासूर. तू तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवलेस, म्हणून मी तूला खाऊन टाकतो. त्याचा तो कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून यम घाबरून पळून गेला. अनलासुर समोर जे दिसेल ते खात सुटला. सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले. तेवढ्यात तेथे अनलासुर आला. त्याला पाहिल्यावर विष्णूही घाबरले. त्यांनी गणपतीचे स्मरण केले.

गणपती बालकाच्या रूपाने विष्णूंपुढे प्रकट झाला. हे विष्णू, आपण माझे स्मरण का केलेत, असे विचारत असतानाच अनलासुराने काही देवांना पकडले. सर्व देव आणि ऋषीमुनी सैरावैरा पळू लागले. गजानन मात्र जागचा हलला नाही. मग अनलासुराने गजाननाकडे मोर्चा वळवला. त्याने गजाननाला गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलले. तो गणपतीला गिळंकृत करणार तोच सर्व देवांनी हाहाःकार केला. अनलासुराच्या हातात त्या बाल गजाननाने प्रचंड विराट धारण केले. त्याचे डोके आभाळाला भिडले. पाय पाताळात रुतले होते. एका क्षणात गजाननाने अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले. त्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली.

गणपतीला खूप त्रास होऊ लागला. हे समल्यावर देव, ऋषी, मुनी या सर्वांनी त्यांना जमतील ते उपचार सुरू केले. अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरू झाले. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला. शंकरा भगवानांनी आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र गजाननाच्या मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होईना. ब्रम्हदेवाने सिद्धी आणि सिद्धी कन्या त्याच्या सेवेसाठी उभ्या केल्या. वाळ्याच्या पंख्याने त्या गणपतीला वारा घालू लागल्या. पण कशाचाही उपयोग होईना. गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे, ही वार्ता समजताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 88 हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी 21 दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले.

असा हा सर्वांचा लाडका बाप्पा दहा दिवस घरात असतो त्यामुळे दहा दिवस उत्सवाचेच असतात. पण अनंत चतुर्दशी ला आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जना वेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचं दिसतं. दहा दिवस एखादा पाहुणा आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परत निघावा असं होउन जातं. तो दिवस सगळयांकरताच मोठया जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्याचा आणि कठीण क्षण असतो. पावलं जड होतात. बच्चे कंपनी तर अक्षरशः रडतांना देखील दृष्टीस पडते. कारण त्यांचा बाप्पा गावाला जाणार असतो ना….गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष आसमंतात घुमत असतो. बाप्पाची मुर्ती पाण्यात जातांना मनात कालवाकालव होते. जो उत्साह त्याच्या आगमनाच्या वेळी मनामनात ओसंडुन वाहात असतो त्याचा लवलेशदेखील त्याला निरोप देतांना आढळुन येत नाही.

– सौ. वर्षा श्रीनिवास भानप 9420747573

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : पानिपत येथे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक (Memorial) उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...