Monday, June 24, 2024
Homeनगरआज ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना, नगरकर सज्ज !

आज ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना, नगरकर सज्ज !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

संकट निवारण करणारी आराध्य देवता आणि पुजेचा पहिला मान असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आज मंगळवार (दि.19) रोजी मोठ्या थाटात आगमन होणार आहे. यासाठी नगरकर सज्ज झाले असून बाप्पाच्या स्वागताची जोरदार आहे. आज पहाटे ते दुपारपर्यंत बाप्पांच्या प्रतिष्ठानेचा मुहूर्त असून श्रींच्या स्थापनेसाठी बाजारपेठेत फुलांपासून पुजेचे साहित्य, सजावटीचे सामान, विद्युत रोषणाईचे साहित्य, नैवेद्य म्हणून मिठाई ते वेगवेगळ्या प्रकारातील मोदक यांची दुकाने सज्ज आहेत. दुष्काळी परिस्थितीत भाविक श्रींच्या आगमनासाठी सज्ज असून आज बाप्पा दिमाखात विराजमान होणार आहेत.

यंदा पावसाने हात दाखवल्याने दुष्काळाचे सावट आहे. मागील आठवड्यात झालेला बैल पोळा सण साध्या पध्दतीने साजरा झालेला आहे. मात्र, पाऊस नसला तरी भाविक श्रींच्या स्वागताची जोरदार तयारी करताना दिसले. यासाठी गणेशमूर्तींसह सजावटीच्या विविध साहित्याचे आणि पूजा साहित्याचे स्टॉलही रस्तोरस्ती आणि चौकाचौकांत सजले आहेत. यामुळे बाप्पाच्या आगमनासोबत बाजारपेठेत चैतन्य दिसत होते. यामुळे श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे. त्यामुळे बाप्पांच्या मुक्कामाचे दहाही दिवस चैतन्याने, आनंदाने भारलेले असतील यात शंका नाही.

नगर शहरातील चितळे रस्ता, दिल्ली गेट, माळीवाडा यासह सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक, पाईपलाईन, कल्याण रस्ता, भिंगार, एमआयडीमधील नागापूर, बोल्हेगाव फाटा, गजानन कॉलेनी या ठिकाणी खरेदीसाठी नगरकरांची गर्दी होती. गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्याची खेरीदी गणेशभक्तांकडून केली जात होती. पूजेचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह फळे, फुले आदींना मोठी मागणी बाजारात होती.यामुळे नगर शहरातील व्यवसायांना बाप्पाच्या आगमनामुळे झळाळी असल्याचे दिसून आले. यंदा पाऊस नसला तरी बाप्पांच्या मूर्तीच्या किंमतीत 20 ते 30 टक्के वाढ दिसून आली.

आज बाप्पांच्या आगमनानंतर दोन दिवसांनी लगेच गुरुवारी गौरींचे आगमन होणार आहे. त्यामुळे पुजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. कापूर, कंठी, अगरबत्ती, धूप, लाकडी पाठ, समई, निरंजन, पितळेचे ताठ, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी या साहित्याला मोठी मागणी आहे. घरगुती गणेशोत्सवासोबत सावर्जनिक गणेश उत्सवाला महत्त्व असल्याने सर्वत्र उत्साह आनंदाचे वातावरण पहावयास मिळत असून आज पहाटे ते दुपारी 1.50 पर्यंत श्रींच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. यंदा पाऊस नसल्याने फुलांच्या दरांनी चांगलाच भाव खाल्ला असून शेवंती 120 ते 150 रुपये किलो, तुळजापुरी फुले 70 रुपये किलो, गुलाब 5 ते दहा रुपये प्रति नग, निशिगंधा 320 ते 800 रुपये किलो व गजरा फुले 650 रुपये किलोप्रमाणे विक्री होताना दिसले.झेंडूच्या फुलांना चांगला भाव होता.

325 गावात‘ एक गाव एक गणपती’

जिल्ह्याभरात सुमारे अडीच हजारांपेक्षा जास्त मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच पोलिसांकडून एक गाव एक गणपती’ योजना प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न करण्यात आले असून सुमारे सव्वा तीनशे गावांत एक गाव एक गणपती बसविण्यात आले असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

श्री गणेश स्थापनेचा मुहूर्त

यंदाच्या वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी आज 19 सप्टेंबरला आहे. पंचांगानुसार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ झाला असून आणि आज 1 वाजून 42 मिनिटांनी चतुर्थी समाप्त होणार आहे. त्यामुळे श्री गणेश चतुर्थी उदयोतिथीनुसार आज साजरी होणार असून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. आज गणेश चतुर्थी आल्याने अंगारक योग तयार झाला आहे. तसेच, वैधृति योगही आज आहे. यासोबतच स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्र यांचा संगम होण्याचाही दुर्मिळ योग असल्याने या दिवशी श्रीगणेशाची पूजा आणि आराधना करणार्‍यांच्या अडचणी गणपती बाप्पा नक्की दूर करेल, असे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या