रामायणातील एका घटनेत लंकापती रावणाचे बंधू रामभक्त विभीषण आणि गणपती बाप्पामध्ये युद्ध झाल्याचा प्रसंग वर्णन केलेला आढळतो. हा प्रसंग दक्षिण भारतात ज्या ठिकाणी घडला, तेथे गणपती बाप्पाचे भव्य मंदिर आहे. नेमके काय घडले होते? जाणून घेऊया…
भारत देश हा जसा विविधतेने नटलेला आहे, तसा तो अनेक अद्भूत रहस्यांनी भारलेला आहे. कैलास पर्वतापासून ते रामेश्वरमच्या रामसेतूपर्यंत हजारो गोष्टी, शेकडो स्थळे अशी आहेत, ज्याची उकल अद्यापही झालेली नाही. हजारो वर्षांपासून अचंबित आणि थक्क करणार्या गोष्टींचे गूढ अद्यापही कायम आहे. रामायण, महाभारत काळातील अनेक गोष्टींचे आकर्षण आजच्या काळातही आपल्याला आहे. हजारो वर्षे लोटली, तरी रामायण आणि महाभारताची गोडी किंचितही कमी झालेली जाणवत नाही.
रामायणातील एक प्रसंग थेट लाडक्या गणपती बाप्पाशी निगडीत असलेला आढळतो. गणपती बाप्पाशी संबंधित सर्वच गोष्टी रंजक मात्र तेवढ्याच प्रेरणादायक आहेत. काही गोष्टी बाप्पाला अजिबात आवडत नाहीत. मात्र, तापहीन असलेली गणेश देवता विघ्नहर्ता, सुखकर्ता आहे. रामायणातील एका घटनेत लंकापती रावणाचे बंधू रामभक्त विभीषण आणि गणपती बाप्पामध्ये युद्ध झाल्याचा प्रसंग वर्णन केलेला आढळतो. हा प्रसंग दक्षिण भारतात ज्या ठिकाणी घडला, तेथे गणपती बाप्पाचे भव्य मंदिर आहे. नेमके काय घडले होते? जाणून घेऊया…
उच्ची पिल्लयार मंदिराची अद्भुतता
अन्य देवतांप्रमाणे गणपती बाप्पाचीही देशभरात शेकडो मंदिर आहे. दक्षिण भारतात असलेल्या तिरुचिरापल्ली (त्रिची) भागात एक उंच डोंगरावर गणपतीचे सुंदर मंदिर आहेत. या मंदिराचे नाव उच्ची पिल्लयार मंदिर असे आहे. सुमारे 273 फूट उंचीवर हे मंदिर उभारण्यात आले असून, मंदिरापर्यंत जाण्यासाठी चारशे पेक्षाही अधिक पायर्यांचा टप्पा पार करावा लागतो. डोंगरावर असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरातून त्रिचीचा पंचक्रोशी भाग अतिशय मनमोहक दिसतो. या मंदिराचा परिसर अगदी नयनरम्य असून, या मंदिराची कथाही तितकीच रोचक आहे. या मंदिराविषयी सांगितली जाणारी कथा ही लंकापती रावणाचे बंधु रामभक्त विभीषण यांच्याशी निगडीत आहे.
उच्ची पिल्लयार मंदिराचा इतिहास
रावणवधानंतर हनुमान, सुग्रीव यांच्यासह विभीषणही श्रीरामांसह अयोध्येत गेले. श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सर्वजण स्वगृही परतत असताना श्रीरामांनी विभीषणांना श्रीविष्णूंची रंगनाथ रुपातील एक मूर्ती भेट दिली आणि लंकेत जाईपर्यंत कुठेही ही मूर्ती जमिनीवर ठेऊ नये, असे सांगितले. श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे विभीषण लंकेत जायला निघाले. मात्र, विभीषण राक्षस कुळातील असल्यामुळे श्रीविष्णूंची रंगनाथ रुपातील मूर्ती लंकेत नेली जाऊ नये, अशी देवतांची इच्छा होती. यासाठी देवतांनी गणपतीचे आवाहन करून त्यांना विनंती केली.
गणपतीचे आवाहन आणि विनंती
लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना विभीषण त्रिची येथे पोहोचले. कावेरी नदीत स्नानादी कार्ये उरकून घ्यावीत, असा विचार त्यांनी केला. स्नानादी कार्ये उरकून घेईपर्यंत त्या मूर्तीचे संरक्षण करू शकेल, अशा व्यक्तीचा ते शोध घेऊ लागले. तेवढ्यात गणपती बालरुपात प्रकट झाले आणि विभीषणासमोर गेले. विभीषणांनी गणपतीच्या हातात ती मूर्ती दिली आणि जमिनीवर न ठेवण्याची विनंती केली. स्नानादी कार्ये उरकल्यानंतर पाहतात तो मूर्ती जमिनीवर ठेवलेली आढळली. ते पाहून विभीषण क्रोधीत झाले आणि बालरुपी गणपतीला शोधू लागले.
विभीषणांचा गणपतीवर प्रहार
मूर्ती ठेवून गणपती तेथील एका पर्वतावर निघून गेले. रस्ता संपल्याने ते तेथेच बसून राहिले. त्या बालकाला पाहून विभीषणांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बालरुपी गणपतीवर जोरदार प्रहार केला. तेव्हा गणपतीने मूळ रुपात प्रकटले. प्रत्यक्ष गणपतीला समोर पाहून विभीषण नतमस्तक झाले आणि क्षमायाचना केली. तेव्हापासून गणपतीचा उच्ची पिल्लयार येथे वास आहे, असे सांगितले जाते. विभीषणांनी केलेल्या प्रहाराची खूण गणपतीच्या मूर्तीवर आढळते, असे सांगितले जाते.
तिरुचिरापल्लीचे प्राचीन नाव थिरिसिरपूर असे होते. उपलब्ध माहितीनुसार, थिरिसिरन नावाच्या राक्षसाने या पर्वतावर महादेवांची कठोर तपस्या केली होती. त्यानंतर हे स्थान थिरिसिरपूरम नावाने ओळखले जाऊ लागले. या पर्वताच्या तीन शिखरांवर अनुक्रमे महादेव शिवशंकर, पार्वती देवी आणि गणपती स्थित असून, या देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. या भागाला पूर्वी थिरि-सिकरपुरम असे संबोधले जायचे. यानंतर त्याचे नाव बदलून थिरिसिरपुरम असे करण्यात आले, असे सांगितले जाते.