Saturday, November 2, 2024
Homeब्लॉगबाग फुलवताना...

बाग फुलवताना…

झाडे लावण्यासाठी योग्य कालावधी म्हणजे पावसाळ्याची सुरुवात. पण, योग्य काळजी घेतली तर आपण उन्हाळ्यातही झाडे लावू शकतो. आपल्या घराच्या परसबागेत कुंड्यांमध्ये झाडे लावायची असल्यास शक्यतो ती संध्याकाळी किंवा सकाळी लवकर लावावीत आणि लावल्यानंतर एक दिवस सावलीतच ठेवावीत. म्हणजे दुसर्‍या दिवशी ऊन आल्यानंतर रोपटे चांगले तरारून येते.

एका कुंडीतले झाड दुसर्‍या कुंडीत लावायचे असल्यास किंवा नर्सरीतून आणलेले रोप कुंंडीत लावायचे असल्यास ते लावण्यापूर्वी एक तास आधी त्याला पाणी घालून ठेवावे. तसेच, कुंडीच्या कडेची माती कुरप्याने सैल करून ठेवावी. म्हणजे झाडांची मुळे दुखावली न जाता अलगदपणे ते झाड आपण दुसर्‍या कुंडीत लावू शकतो. शिवाय पाणी टाकलेले असल्यामुळे झाडांच्या मुळामध्ये ते पाणी धरून ठेवलेले असते. परिणामी दुसर्‍या कुंडीत रुजेपर्यंत ते पाणी झाडांच्या मुळांना पुरते. झाडांच्या मुळांना पाण्याबरोबरच हवेचीही गरज असते. म्हणूनच कुंडीतील माती सतत पाण्याने गच्च ओली नसावीत.

पुरेशा प्रमाणातच पाणी टाकावे आणि दर आठवड्याला खुरप्याने कुंडीतील माती थोडी सैल करावी. म्हणजे मुळापर्यंत हवा खेळती राहण्यास मदत मिळते. अनेक वेळा कुंडीमध्ये मुख्य झाडाबरोबर नको असलेली छोटी झाडे किंवा तण वाढतात. हे तण मातीतील पोषक द्रव्ये आणि पाणी शोषून घेतात. त्यामुळे झाडांना पुरेशा प्रमाणात त्यांचा पुरवठा होऊ शकत नाही. म्हणूनच असे तण किंवा छोटी रोपे वेळोवेळी कुंडीतून काढून टाकावेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात फुलझाडे लावताना ज्या जागेत आपल्याला ती लावायची आहेत तेथे किती प्रमाणात सूर्यप्रकाश येतो आणि तो लावलेल्या झाडासाठी पुरेसा आहे की जास्त आहे याची माहिती करून घ्यावी.

- Advertisement -

उन्हाळ्यात झाडांना पाणी घालताना काही पथ्ये अवश्य पाळावीत. झाडांना शक्यतो सकाळी 10 च्या आतच पाणी घालावे किंवा संध्याकाळी 6 नंतर पाणी घालावे. मधल्या वेळेत ऊन जास्त असते. त्या वेळेत पाणी घालू नये, अन्यथा झाडे जळतात. उन्हामुळे झाडातील मातीतून पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. अशावेळी झाडाच्या मातीत पाणी टिकून राहणे आवश्यक असते. म्हणून कुंडी शक्यतो प्लास्टिकच्या ताटलीत पाणी घालून त्यामध्ये ठेवावी. म्हणजे माती खालून पाणी शोषून घेऊ शकेल. तसेच आणखी एक उपाय करता येण्यासारखा आहे. घरातील एखादी पाण्याची रिकामी बाटली घेऊन तिला बारीक छिद्र पाडावे आणि त्यात पाणी भरून ती बाटली कुंडीमध्ये ठेवावी म्हणजे हळूहळू त्यातून पाणी कुंडीच्या मातीत झिरपत राहील आणि मातीतील ओलावाही टिकून राहील. परिणामी, उन्हाळ्यातही झाडे टवटवीत राहतील.

सुचित्रा दिवाकर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या