अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अमेरिका- इस्त्राईल आणि इराण युध्दामुळे नगरसह राज्यात गॅस टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने केरोसीनचा (रॉकेल) देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पुरवठा विभागाकडून त्यात्या जिल्ह्यात असणारे पूर्वीचे रॉकेल घाऊक विक्रेते यांच्यासह त्यांच्याकडे रॉकेलच्या साठवणुकीची सोय आहे?, रॉकेल वाहतुकीसाठी वाहनांची उपलब्धता आहे? आदी माहिती मागवली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात साडेसात लाख लाभार्थी असतांना सरकार जिल्ह्याला 1 लाख लिटर रॉकेल देणार आहे. मिळणारे हे रॉकेल कोणाकोणाला कसे द्यावे, असा प्रश्न पुरवठा विभागासमोर राहणार आहे.
राज्यातील गॅस टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने गॅसचा काळाबाजारावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. मात्र, राज्यात शहरी भागात अनेक ठिकाणी अद्याप गॅस टंचाईची परिस्थिती नियंत्रणात नाही. त्यावर मात करण्यासाठी आता सरकारने रेशनकार्ड धारकांना रॉकेलचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेत साडेसात लाख लाभार्थी आहेत. या सर्वांसाठी सरकारकडून नगर जिल्ह्यासाठी 1 लाख लिटर रॉकेलचा कोठा मंजूर करण्याच्या हालचाली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील रॉकेल विक्रेत्यांनी दहा वर्षापूर्वीच रॉकेल विक्रीचा व्यवसाय बंद केलेला आहे. तसेच 2016 ला नगर जिल्हा केरोसीनमुक्त जिल्हा घोषित करण्यात आलेला आहे. त्यात आता सरकारने जिल्ह्यातील पूर्वीचे घाऊक आणि सेमी घाऊक रॉकेल विक्रते, त्यांच्याकडे रॉकेल साठवणुकीची आणि वाहतुकीची व्यवस्था आहे का? याबाबतचा तपशील मागवला आहे.
सरकारने विचारलेली ही माहिती आधारे जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडून मागवली आहे. येत्या दोन दिवसात संबंधीत माहिती जिल्हा पातळीवर सादर करण्यास सांगण्यात आले असून माहिती उपलब्ध झाल्यावर ती सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जर जिल्ह्याला एक लाख लिटर रॉकेलला उपलब्ध झालेले तर ते साडे सात लाख लाभार्थ्यांना कसे वाटप होणार हा देखील प्रश्न पुरवठा विभागाला सतावत आहे.
41 घाऊक विक्रेते
नगर जिल्ह्यात दहा वर्षापासून रॉकेलची विक्रीजवळपास थांबलेली आहे. 2016 ला जिल्हा रॉकेल मुक्त जिल्हा घोषित करण्यात आलेला आहे. अशात आता सरकारने पुन्हा रॉकेल उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे यापूर्वीचे जिल्ह्यातील 41 घाऊक व 10 सेमी घाऊक रॉकेल विक्रेते यांची माहिती सरकारकडून घेण्यात येत आहे.





