धुळे – प्रतिनिधी dhule
निवडणुका (Elections) आणि सत्तेची लालसा डोळ्यासमोर ठेऊन धनगर समाज महासंघ (Dhangar Samaj Federation) कधीही काम करीत नाही. काही लोक निवडणुका आल्या की, पदे मिळवण्यासाठी त्यांना धनगर समाज आठवतो. सभा, मोर्चे, आंदोलनातून ते आपल्या नेत्यांना ताकद दाखवून पदे मिळवतात.
मात्र धनगर समाज महासंघ समाज हितासाठी कायमच लढत राहिला आहे. त्यामुळे धनगर समाजाने एकजुटीची ताकद दाखवणे गरजेचे आहे. धनगर आरक्षणासह समाजाच्या मागण्यांना न्याय मिळाला नाही तर धनगर समाज महासंघ यापुढे राजकीय पर्याय उभा करणार असल्याचे थेट आव्हान महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.चिमणभाऊ डांगे (Adv. Chimanbhau Dange) यांनी धुळे येथे संपन्न झालेल्या धनगर समाज जिल्हा मेळावा व धनगर समाज महासंघाच्या नवीन पदाधिकारी नियुक्ती प्रसंगी दिले.
धुळे जिल्हा धनगर समाज महासंघाच्यावतीने आयोजित मेळाव्याला जिल्ह्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.चिमणभाऊ डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.10 सप्टेंबर रोजी धुळ्यात सैनिकी लॉन्स, कल्याण भवन येथे धनगर समाज महासंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महासंघाच्या विविध जिल्हा व प्रदेश स्तरावरील शाखेवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी महासंघ, सांस्कृतिक महासंघाने या मेळाव्याचे आयोजन केले होते.
मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष ॲड.चिमणभाऊ डांगे यांनी सांगितले की, अनेक संघटना आल्या आणि संपल्याही, पण आजही धनगर समाज महासंघ ही संघटना समाजातील प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक माणसामागे खंबीरपणे उभी आहे. यापुढेही समाजाच्या हितासाठीच लढा सुरू राहणार आहे.
एक स्वतंत्र वैचारिक लढ्याची दिशा महासंघाला आहे. त्यामुळे आजपर्यंत धनगर समाजाच्या अनेक समस्या महासंघाच्यामुळे सोडविण्यात आल्या आणि समाजाला न्यायही मिळाला. समाजाचे नेते आणि महासंघाचे संस्थापक मा.अण्णासाहेब डांगे यांनी मंत्रिमंडळात ठराव करून सहकारी संस्थेच्या निवडणुकीत धनगर समाजासाठी एक जागा प्रतिनिधित्व म्हणून आरक्षित केली. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक जण वल्गना करतात मात्र ज्यावेळी बोलायची वेळ येते त्यावेळेस त्यांचे तोंडे गप्प का असतात? असा रोखठोक सवाल ॲड.डांगे यांनी विचारला.
धनगर समाज महासंघ कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही, फक्त समाजहित त्यासमोर ठेवून महासंघाचा लढा सुरू आहे. त्यामुळे धनगर समाजाने एकजुटीची ताकद दाखवल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक गावातून फक्त दोन कार्यकर्ते समाजासाठी लढले तर एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही.
यापुढे धनगर आरक्षणासह समाजाच्या मागण्या सोडवल्या नाहीत तर येणाऱ्या काळात राजकीय पर्याय उभा केला जाईल. असे थेट आव्हान ॲड. डांगे यांनी या मेळाव्यातून दिले. महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनीलभाऊ वाघ यांनी सांगितले की, राजकीय पक्ष धनगर समाजाचा केवळ पदासाठी वापर करीत असतात. मागील काही काळापासून धनगर समाजामध्ये अनेक संघटनांचे पेव फुटले आहे, समाजाच्या जीवावर अनेक पदे मिळवली आणि ते सोईस्कररित्या धनगर समाजाला विसरले.
धनगर आरक्षण मिळावे म्हणून टीस कमिटीचा अहवाल तयार करण्यात आला. मात्र समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून आजही राज्यकर्ते तिचा अहवाल जाहीर करीत नाही. त्यामुळे समाजाने संघटितपणे एकत्र येण्याची गरज असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. मेळाव्यात मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस बबनराव रानगे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष डॉ.अलकाताई गोडे, कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश निर्मळ यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्याला वरील मान्यवरांसह धुळे पंचायत समिती माजी सभापती भगवान आप्पा गर्दे, विद्यमान सभापती प्रा.विजय पाटील, नगरसेवक अमोल मासुळे,महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक मुजगे, सरचिटणीस गोरखराव पाटील, जि.प.सदस्य किशोर आल्लोर, ज्येष्ठ नेते आप्पा बागले, ज्येष्ठ नेते गो.पी. लांडगे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, मल्हार सेनेचे लखन भाऊ गोराड, शांताराम पाटील, प्रा.सदाशिव भलकार,राजेश बागुल, रविंद्र मोरे, विलास धनगर, उपाध्यक्ष सोमनाथ पाटील, मल्हार सेना अध्यक्ष दादाजी पदमोर, बापू बागूल, सतीश सरक, पत्रकार राजेंद्र गर्दे, मनोज गर्दे, लक्ष्मण पाटील जिल्हा समन्वयक चुडामण पाटील, रतिलाल पाटील, विठ्ठल लांडगे, मनोज धनगर, शैलेश बोरसे, कार्याध्यक्ष-ज्ञानेश्वर मासुळे, नानाभाऊ वाघ, मुकुंदभाऊ अहिरे, संदीप खताळ, युवराज हाटकर आदी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचलन गोरखराव पाटील यांनी केले, तर आभार नाना वाघ यांनी मानले.