नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतातील ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात आधीच कायदेशीर बाबींना सामोरे जात असलेल्या अदानी यांना अमेरिकेच्या न्यायालयात अब्जावधी डॉलर्सची कथित लाच आणि फसवणुकीप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील न्यायालयात गौतम अदानी यांच्यासह सात लोकांवर २५० दशलक्ष डॉलर, भारतीय चलनात २१ अब्ज, १० कोटी, ८३ लाख, २५ हजारांची लाच देण्याचा आणि फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या वृत्तानंतर आज गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्स शेअर्सला सर्वाधिक फटका बसला. हा शेअर्स २० टक्के घसरला. अदानी ग्रीन शेअर्स सुमारे १८ टक्के घसरला. अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर १३ ते १४ टक्क्यांनी घसरले. अदानी एंटरप्रायजेस, अंबुजा सिमेंट्स, एसीसी, अदावी पोर्ट्स या शेअर्सना १० टक्क्यांचे लोअर सर्किट लागले.
नेमके प्रकरण काय आहे?
अमेरिकेच्या न्यायालयाने गौतम अदानी यांच्यावर कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी २६५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २२३६ कोटींची लाच दिल्याचा आणि लपवल्याचा आरोप आहे. हे सर्व प्रकरण अदानी ग्रीन एनर्जी आणि इतर कंपन्यांशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात गौतम अदानी आणि त्यांच्या काही नातेवाईकांसह आठ जणांची नावे आहेत. बुधवारीच अदानींनी २० वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून ६० कोटी डॉलर्स उभारण्याची घोषणा केली होती. पण ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ही फंडरेजिंग योजना रद्द करण्यात आली आहे.
गौतम अदानी, सागर अदानी, विनीत एस जैन यांनी अमेरिकन, परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलून ही लाचेची रक्कम उभी केल्याचा आरोप आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत अदानींसह सर्वांनी भारत सरकारसाठी कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून २० वर्षांत २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त नफा होईल, असा अंदाज होता, असेही आरोपात म्हटलेय.
कोणा कोणाचा नावे?
यामध्ये गौतम अदानी, सागर एस अदानी, विनीत एस. जैन, रणजीत गुप्ता, सिरिल काबेनेस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा, रुपेश अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.दरम्यान, या प्रकरणी अदानी ग्रुपने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा