भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.
भारतामध्ये महाराष्ट्रासारख्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. या राजघराण्याने इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केले. सातवाहनांच्या राजवटीचा हा सुवर्णकाळ मानला जातो. त्याचे दाखले विविध माध्यमातून मिळतात. सातवाहन राजघराण्यात मातृसत्ताक पद्धत प्रचलित होती. आईच्या नावावरून मुलाचे नाव ठेवले जायचे. अनेक सातवाहन राजांच्या शौर्य गाजवण्यात, राज्यकारभारात त्यांच्या आईचा मोलाचा वाटा राहिला आहे. आईचे नाव ही त्याची ओळख होती. गौतमीपुत्र सातकर्णी व वशिष्ठीपुत्र पुलुवामा या राजांच्या नावाआधी त्यांच्या आईचे नाव आहे. आईचे नाव ही त्यांची ओळखच नाही तर आपल्या मुलांच्या जडणघडणीत, राज्याच्या कारभारात त्याच्या आईची भूमिका खूप महत्त्वाची होती. सातवाहनांची राजधानी पुरातन प्रतिष्ठान म्हणजे गोदावरी काठावरील पैठणनगरी होती.
सातवाहन वंशाच्या सर्व राजांमध्ये गौतमीपुत्र सातकर्णी हा पराक्रमी राजा होऊन गेला. गौतमीपुत्र सातकर्णीने शक, पलव, हूण ग्रीक या शत्रूंचा युद्धात पराभव केला. हे वर्ष होते इसवी सन 78 आणि हे युद्ध आताच्या नाशिक परिसरात लढले गेले. शालिवाहनाने म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीने शकांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून हिंदू नववर्षाची सुरुवात या नवीन कालगणनेनुसार सुरू झाली. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरत आहे. याला अभ्यासक दुजोरा देतात. इतिहासतज्ज्ञ प्रभाकर देव यांचा प्राचीन भारताचा अभ्यास आहे. याविषयी त्यांनी म्हटले होते, इसवी सन पूर्व 236 च्या आसपास पैठण परिसरात सातवाहन साम्राज्य म्हणजेच शालिवाहन साम्राज्य स्थापन झाले. सातवाहनांतील सगळ्यात श्रेष्ठ सम्राट म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी याचे नाव घेतले जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणजेच इसवी सन 72 ते 95 याकाळात हा सत्तेवर होता. या राजाशी संबंधित एक शिलालेख नाशिकच्या लेण्यांमध्ये सापडला आहे.
मौर्यांच्या साम्राज्यानंतर कुशान, हूण, पल्लव, शक यांसारख्या परकीय टोळ्यांनी संपूर्ण उत्तर भारतावर आक्रमण केले. दक्षिण भारताला या परकीय आक्रमणातून वाचवण्याचे काम हे गौतमीपुत्राने केले. गौतमीपुत्राने शकांचा पराभव केला आणि त्या वेळेपासूनच शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली. देव यांच्या अभ्यासानुसार, गौतमीपुत्राने इ.स. सन 78 मध्ये शक कालगणना सुरू केली, हे ऐतिहासिक वास्तव आहे. शालिवाहन म्हणजेच सातवाहन. शालिवाहन हे संस्कृतीकरण आहे, असे शालिवाहन साम्राज्याचे अभ्यासक इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी म्हटले आहे.
गौतमीपुत्र सातकर्णी याचा कालखंड सातवाहन राजांच्या कालखंडातील सुवर्णकाळ होता. गौतमीपुत्र सातकर्णी याची माता गौतमी बलश्री ही होती. तिने आपल्या मुलाला घडवताना, त्याला एक आदर्श, शूर राजा बनवताना मोठे कष्ट घेतले. राजा शालिवाहनची आई गौतमी ही प्रजापती होती.
बालवयात गौतमी आपल्या आई-वडिलांना दुरावली होती. तिचे संगोपन एका कुंभाराने केले. गौतमी ही देखणी आणि बुद्धिमान होती. कुंभाराने तिचा विवाह शूर सरदारबरोबर करून दिला. तिला पुत्र झाला. कुंभाराच्या घरात राहूनच तिने आपल्या बाळाला वाढवले. ती अतिशय सुज्ञ आणि महत्त्वकांक्षी होती. आपल्या बाळाशी खेळताना ती मातीचे हत्ती, घोडे, लढवय्ये अशी खेळणी बनवत असे. तो त्या खेळण्यांबरोबर खेळायचा. तिने त्याच्यासाठी मातीचा एक मोठा घोडा बनवला होता. त्यावर तो बसायचा. गौतमीपुत्र सातकर्णी हा आपल्या आईप्रमाणे तेजस्वी होता. त्याचे बालपण संकटात गेले. बालपणापासून त्याच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत होते. मुलाला घडवण्यासाठी गौतमी दिवसरात्र कष्ट करत होती. अशी कथा आहे की, उज्जैनचा राजा विक्रमादित्य यास कुणीही हरवू शकत नसे. त्यालाही गौतमीपुत्राकडून पराभव पत्करावा लागला होता. शालिवाहन मोठा झाला. त्याने पैठणला स्वतःचे राज्य निर्माण केले. त्याच्या उत्कर्षात त्याच्या आईचा हात होता. पुढे स्वतःच्या हिंमतीने, शौर्याने त्याने आपल्या राज्याच्या सीमा वाढवल्या. शालिवाहन राजाधिराज झाला.
शालिवाहनाच्या आधी शक, यवन, पल्लव, ग्रीक या परदेशी लोकांनी हिंदुस्थानावर स्वार्या करून मुलुख काबीज केला होता. त्या परकीय शत्रूंची राजवट उलथून टाकून त्यांना या देशातून हद्दपार करण्यासाठी शालिवाहनच्या आईने त्याला या परकीय शत्रूंविरुद्ध युद्ध करण्यास भाग पाडले होते. परकीयांकडून जनतेवर होणारे अन्याय, अत्याचार दूर व्हावे, प्रजा सुखात राहावी यासाठी गौतमीने आपल्या पुत्रास आदेश दिला. गौतमीपुत्राने प्रचंड शक्तीनिशी या परकीयांशी युद्ध केले. या युद्धात त्याचा विजय झाला. देशातील सर्व लोकांनी आपल्या संरक्षणाकरता हा प्रभू योग्य आहे म्हणून शालिवाहनास, गौतमीपुत्रास आपला राजा म्हणून पसंत केले. गौतमीपुत्राने एकामागून एक असे प्रांत जिंकत परदेशी शत्रूंना जमीनदोस्त केले. डोंगराच्या कुशीत खडक पोखरून सुंदर लेणी बांधून घेतल्या. रणांगणावर जाताना त्याच्याबरोबर त्याची आई गौतमीदेखील युद्धभूमीत उतरत असे. स्वपराक्रम व मातेच्या सहाय्याने त्याने अनेक राजांना जिंकले. मध्य भारतातील मोठ्या प्रदेशातून परकीयांना हाकलून पराक्रमाने तो भाग आपल्या स्वामित्वाखाली आणून लोकांना सुखी केले. लोकांचे कल्याण केले, रक्षण केले. तो खर्या अर्थाने लोकांचा राजा झाला. दख्खन देशाची भरभराट त्याच्याच काळात झाली. महाराष्ट्र समृद्ध झाला. सर्वत्र आपले वर्चस्व स्थापून आपल्या पुत्राने सार्वभौम महाराजाधिराज बनावे, आपल्या पराक्रमाने सर्व शत्रूंना अज्ञानंकित करून ठेवावे ही आई गौतमीची इच्छा होती. ती तिच्या पुत्राने पूर्ण केली.
आपल्या पुत्राच्या पराक्रमाविषयी माता गौतमीने नाशिक येथील पांडवलेण्यांमधील एक शिलालेख खोदून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. गौतमी-बलश्रीने- क्षहरातवंश-निरवशेषशकर शकपल्लव निषूदन समुद्रतोयपितवाहन या शिलालेखामध्ये आपल्या पुत्राबद्दल गौरवाने लिहून घेतले की, शक, पल्लव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा, सातवाहन कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा वीर म्हणजेच गौतमीपुत्र सातकर्णी होय.
या शिलालेखावरून लक्षात येते की, गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राज्यांनी स्वीकारले होते. गौतमीपुत्र सातकर्णीने मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिण भारतात दिग्विजय केला. नाशिक जिल्ह्यात जोगलटेंभी येथे मिळालेल्या नाण्यावरून लक्षात येते की, शक राजा नहापान याच्या नाण्यावर गौतमीपुत्राची मुद्रा उमटलेली दिसते. त्यावरून नहापानावर विजय मिळवून गौतमीपुत्र सातकर्णीने आपले सामर्थ्य सिद्ध केले होते.
सातवाहन साम्राज्य हे विशेषत: गोदावरी काठी वसलेले होते. त्यावेळीही गोदावरी नदीचा गौरव आणि तिचे पावित्र्य- स्वच्छता राखावी यासाठी सातवाहन राजांनी त्यांच्या नाण्याच्या एका बाजूला ‘सिरीगोला’ असे लिहिले होते, तर दुसर्या बाजूला नदीपात्रात कमंडलू घेऊन उभी असलेल्या गोदावरी देवतेचे चित्र छापले होते. ते नाणे चलनात होते. सातवाहन काळातील ‘हल’ या सातवाहन राजाने ‘गाथा सप्तशती’ हा ग्रंथ निर्माण करून घेतला. यामध्ये राज्यातील जनतेकडून साहित्यरचना तयार करवून, जमा करून त्यातील उत्कृष्ट असलेल्या 700 साहित्यरचनांचा समावेश गाथा सप्तशती या ग्रंथामध्ये केला. कृषिप्रधान संस्कृती, कला, संगीत शृंगार याविषयी यात वर्णन आहे.
गाथा सप्तशतीमधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब या गाथांतून आढळून येते. प्राकृत भाषेच्या पाऊलखुणा असलेल्या हा पहिला लिखित ग्रंथ समजला जातो.
गोदावरी नदीच्या काठावरील वैभवशाली सातवाहन राज्यातील पराक्रमी गौतमीपुत्र सातकर्णीचा इतिहास मराठी माणसाच्या मनात अभिमान निर्माण करतो आणि त्याला घडवणार्या गौतमी मातेविषयी आदरभाव निर्माण होतो.