Saturday, May 4, 2024
Homeनगरगावरान आंब्याची तोडणी सुरू

गावरान आंब्याची तोडणी सुरू

वळण |वार्ताहर| Valan

सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. मात्र, खवय्यांच्या आवडीचा आणि गोड मधूर असलेला गावरान आंबा संकरित आंब्यांच्या जमान्यात हद्दपार होत असतानाच राहुरीच्या पूर्वभागात शेतकर्‍यांनी बांधावर लावलेल्या गावरान आंब्यांना अच्छे दिन आले आहेत. आता या गावरान आंब्यांची तोडणी सुरू झाल्याने शेतकरी आता खरिपपूर्व हंगामात तोडणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. आता राहुरीच्या पूर्वभागात पाडालाच आंबा पिकल्याने शेतकरी समाधानी आहेत. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आंब्याला बसल्याने उत्पादनात किंचित घट होणार आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात शेतकर्‍यांनी लावलेल्या आपल्या बांधावरील गावरान आंब्याची झाडे फळांनी लगडले आहेत. येथील शेतकरी सीताराम गोसावी, सुदामराव शेळके यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी देखील आपल्या बांधाच्या कडेला गावरान आंब्याची झाडे लावली होती. गावरान आंब्यात आशिकी गावरान आंबा खाण्यासाठी गोड लागतो. तो आरोग्यवर्धकही आहे. त्याला बाजारात चांगला भाव मिळतो. अशी माहिती शेतकरी सीताराम गोसावी यांनी दिली.

सुदामराव शेळके म्हणाले, चालूवर्षी आमच्या बांधाच्या कडेला दोन गावरान आंब्याची झाडे आहेत. मात्र यावर्षी वातावरणामुळे झाडाला फळधारणा झाली नाही. नानाभाऊ खुळे म्हणाले, आमच्या शेताच्या बांधाच्या कडेला चार ते पाच झाडे आहेत. त्याची फळे एकदम गोड आहेत. या झाडाच्या कैर्‍यांपासून आंबे खाऊन, लोणचं करून पाच ते सात हजार रुपये प्रत्येक वर्षी होतात. उन्हामध्ये आंब्याच्या झाडाखाली गारवाच रहातो. असे शेतकरी चंद्रभान काळे म्हणाले.

आंबा काढण्याचे काम ऋषिकेश बाबासाहेब सूर्यवंशी, कुंदन रमेश जाधव हे करतात. ते म्हणाले, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आंबा उतरविण्याचे काम करतो. तर आमचे वडील बाबुराव सूर्यवंशी, सोपान सूर्यवंशी देखील आंबा, चिंचा उतरविण्याचे काम गेल्या आमच्या तीन पिढ्यापासून करतात. त्यावरच उदरनिर्वाह चालतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या