अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पाथर्डी परिसरात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पसार असलेल्या दोन संशयित आरोपींना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्रीसाठी बाळगत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सदर कारवाई बुधवारी (21 मे) माणिकदौंडी चौक, पाथर्डी येथे करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक लाख 40 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणार्या इसमांविरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुदस्सर सादीक सय्यद (वय 22, रा. पाथर्डी) व सोमनाथ रमेश काळोखे (वय 24, रा. आनंदनगर, पाथर्डी) हे दोघे संशयित इसम माणिकदौंडी चौकात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याचे समजताच पथकाने तत्काळ कारवाई करत त्यांना अटक केली.
त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चार मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 40 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस तपासात उघड झाले की, हे दोघेही पाथर्डी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पसार संशयित आरोपी होते. याशिवाय त्यांच्यावर नव्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.