अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अवैध गावठी कट्टे बाळगणार्या इसमांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया करून तिघा इसमांना अटक केली आहे. या कारवायांमध्ये दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पाथर्डी व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणार्या इसमांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यांच्या पथकाला आवश्यक ती माहिती काढण्याचे निर्देश दिले.
शुक्रवारी (28 मार्च) मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीतील स्मशानभूमीजवळ गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे (वय 29, रा. जवळा, ता. जामखेड) व संतोष उर्फ विशाल बाळासाहेब शिंदे (वय 26, रा. कसबापेठ, पाथर्डी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यांच्याविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (29 मार्च) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळालेल्या माहितीनुसार, बेलेश्वर चौकाजवळ एक इसम कंबरेला गावठी कट्टा लावून संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्या इसमाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे आढळली. सदर इसम अजित माधव रायकवाड (वय 51, रा. बुर्हाणनगर, ता. अहिल्यानगर) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातून आणला कट्टा
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डीत पकडलेल्या ज्ञानेश्वर कोल्हेकडे अधिक चौकशी केली असता त्याने गावठी कट्टा मध्यप्रदेशातील उज्जैन येथून आणल्याचे सांगितले. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यप्रदेश राज्यातून गावठी कट्टे येत असल्याचा प्रकार यापूर्वी देखील अनेकवेळा समोर आला आहे. जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवायामधून समोर येत आहे.