श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बेलापूर येथून श्रीरामपुरात गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार्या तीन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आनंदा यशवंत काळे, विशाल बबन सोज्वळ, विजय यशवंत काळे (सर्व राहणार श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अग्निशस्त्रे बाळगणार्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, संतोष खैरे, योगेश कर्डिले, बाळासाहेब गुंजाळ, रमिझराजा आतार, अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार करून सदर पथकास जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणार्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणार्या इसमांची माहिती काढत असतांना पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तीन इसम हे त्यांच्या कारमधून गावठी कट्टा (अग्निशस्त्र) विक्रीसाठी घेवून बेलापूर येथून श्रीरामपूरकडे येत असल्याच माहिती मिळाली.
पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीरामपूर – बेलापूर रोडवरील अनारसे हॉस्पिटलसमोर रोडलगत सापळा लावून एक कार थांबवून त्या इसमांची व कारची झडती घेतली असता कारच्या डॅशबोर्डच्या डिक्कीमध्ये 35 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र), दोन हजार रुपये किमतीचे 4 जिवंत काडतुसे, 7 लाख रुपये किमतीची होंडा कंपनीची होंडा सिटी कार तसेच तीन मोबाईल असा एकूण 7 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेला आरोपी आनंदा यशवंत काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे




