संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तोंडावर संगमनेरात (Sangamner) गावठी कट्ट्यासह (Gavathi Katta) चारचाकी वाहन पकडले असून 31 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाई सोमवारी (दि.28) रात्री केली आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संगमनेर शहर पोलीस ठाणे (Sangamner Police Station) हद्दीतील कुरण रस्ता येथे एकजण अवैध गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना समजली होती.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी वरील ठिकाणी जावून खात्री केली असता आशिष सुनीलदत्त महिरे (वय-28, मूळ रा. सातपूर, जि.नाशिक, हल्ली रा.गोल्डनसिटी, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर) हा रस्त्याच्या कडेला अंधारात उभा होता. त्याची अंगझडती घेत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चालकाच्या सीटखाली गावठी कट्टा मिळून आला.
पोलिसांनी आशिष महिरेची विचारपूस केली असता संगमनेरमध्ये अधिक रक्कम देणारा कोणी भेटल्यास त्यास मी सदरचा पिस्तूल विकणार असल्याचे त्याने सांगितले. त्यास शस्त्र बाळगण्याबाबत अधिकृत परवाना आहे का? असे विचारले असता परवाना नसल्याचे त्याने सांगितले. यावेळी पोलिसांनी (Police) चारचाकी वाहन क्रमांक (एमएच. 15, एफएफ. 9630), गावठी कट्टा, चार मोबाइल असा एकूण 31 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आशिष सुनीलदत्त महिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या धडक कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.