अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील एका व्यक्तीकडून गावठी कट्टे (Gavathi Katta) खरेदी करून ते विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या शनिशिंगणापुर (ता. नेवासा) (Shani Shingnapur) येथील युवकाला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) पकडले. विशाल नामदेव चंद्रे (वय 21) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून दोन कट्टे, चार जिवंत काडतुसे असा एकुण 80 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. दरम्यान, चंद्रे याने सदरचे कट्टे व काडतुसे बंटी ऊर्फ भावेश अशोक राऊत (रा. अहिल्यानगर) याच्याकडून विकत घेतली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी दोघांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम हा गावठी कट्टे खरेदी करून विक्री (Gavathi Katta) करण्याकरीता घेऊन जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने सदर ठिकाणी जावुन रेल्वे स्टेशन परिसरातील लोखंडी पुलावर सापळा लावून विशाल नामदेव चंद्रे याला पकडले. त्याच्या ताब्यात कट्टे व काडतुसे (Cartridges) मिळून आली.
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, सुर्यकांत डाके, अभय कदम, अमोल गाढे, अतुल काजळे, सतिष शिंदे, राम हंडाळ, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.