राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात कारवाई करत गावठी कट्टा (Gavthi Katta) व काडतुसांसह (Cartridges) दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील 5 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 20 एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस ठाणे (Rahuri Police Station) हद्दीत गस्त घालत असताना पो.उप.नि संदीप मुरकुटे यांना गुप्त माहिती मिळाली की, विशाल पालवे व सोमनाथ मोरे हे दोघे जण गोटुंबे आखाडा ते शनिशिंगणापूर मार्गावर पांढर्या रंगाच्या चारचाकीमध्ये विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत आहेत.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पथकाने पंचांना सोबत घेत उंबरे येथील एका हॉटेल परिसरात सापळा रचला. सायंकाळी सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन आढळून आले. वाहनात बसलेल्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे विशाल वसंत पालवे (वय 28, रा. घोडेगाव, ता. नेवासा) व सोमनाथ भानुदास मोरे (वय 32, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) अशी सांगितली. पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपी विशाल पालवे याच्या कमरेला खोचलेला गावठी कट्टा (पिस्टल) मॅगझिनसह आढळून आला. तसेच त्याच्याकडून एक जिवंत काडतूस व एक मिसफायर काडतूस जप्त (Seized) करण्यात आले. याशिवाय दोन्ही आरोपींकडून प्रत्येकी एक अँड्रॉईड मोबाईल फोन तसेच घटनास्थळी असलेली सुझुकी कंपनीची चारचाकी कार जप्त करण्यात आली.
जप्त मुद्देमालामध्ये सुमारे 30 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, 2 हजार रुपये किमतीची काडतुसे, 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन व 5 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 5 लाख 52 हजार रुपयांचा समावेश आहे. या प्रकरणी पो. कॉ. भगवान बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.न. 397/2026 नोंदविण्यात आला असून शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.





