नववर्षाचं स्वागत जल्लोषात करायचा प्रघात अनेकोनेक वर्षांपासूनचा. कोरोनानं हे संदर्भ बदलून टाकल्यामुळे आता आपल्याला नववर्षाच्या स्वागताचा आनंद कुटुंबातच साजरा करावा लागत आहे. अर्थात मर्यादा घातल्या, तरी आनंद तो आनंदच! प्रत्येक क्षण आनंदी करण्याचा, आश्वासक करण्याचा प्रयत्न आपल्याच हाती आहे. हे सामाजिक भान जागं ठेवून नव्या वर्षाचं स्वागत केलं पाहिजे.
मल्हार अरणकल्ले, प्रसिध्द लेखक
एकतीस डिसेंबरची मध्यरात्र कधी एकदा कूस बदलते याची प्रतीक्षा जगभरातल्या अनेक देशांमध्ये त्या दिवशी होत होती. घड्याळातले काटे नेहमीच्या गतीनं चालत होते; आणि ते तसेच पुढं सरकणार होते; तरीही त्या काट्यांनी आता वेगानं धावत सुटावं, अशी अपेक्षा सगळ्या डोळ्यांमध्ये तुडुंबलेली होती. आता जास्त नाही; फक्त थोडाच वेळ. झालं. संपतच आलं. आता काही मोजके क्षण. एक-दोनच मिनिटं. तीही होत आली. शेवटचा मिनिट संपण्याची सुरुवातही झाली. आता सेकंदांची घरं. तीही एकेक करत कमी होऊ लागली. एकूणसाठ, अठ्ठावन्न, सत्तावन्न… दशकाची घरं ओलांडून सेकंद काटा भराभर पुढं निघाला आहे. तीस घरं ओलांडली. चाळीस घरंही संपली. पन्नासमधून वजावट सुरू झाली. आता शेवटचं दशक. तेही संपत आलं. चार, तीन, दोन, एक… बघता बघता तो एक सेकंदही पुसून गेला. सगळीकडून जल्लोषाचे आवाज झेपावू लागले : हॅपी न्यू इयर… हॅपी न्यू इयर… ये ये नव्या वर्षा, तुझं स्वागत आहे! आम्ही खुल्या मनानं तुझ्या आगमनानं तुझीच वाट पाहत आहोत… आणि खरोखरच नव्या वर्षाचं पहिलं पाऊल पडलं.
या सगळ्या जल्लोषात घरंगळून गेलेला तो शेवटचा क्षण कुठल्या कुठं हरवून गेला! त्या संपलेल्या क्षणाचे पुसटसे ठसेही मागे उरले नाहीत, इतका तो दूर निघून गेला. शनिवारचा प्रारंभ होताना जगभरात हाच माहोल होता. हाच आनंद होता; पण तो काही तरी हरवल्यासारखा होता. अपूर्ण होता. कोरोना महामारीच्या संकटामुळे गेली दोन वर्षं माणसाच्या जगण्याचा सारा तोलच बिघडून गेला आहे. पायांखालची जमीन हेलकावत-सरकत रहावी, अशा क्षणांची भयानकता आपल्याला अनेकदा टकरा देत राहिली आहे. अजूनही हे धक्के सुरूच आहेत. कोरोनाचं सावट अंधूक होत चाललं असतानाच नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अनेक देशांनी निर्बंध लागू करण्याची पावलं उचलायला सुरुवातही केली आहे. साहजिकच पुन्हा बंधनं आली आहेत. आपल्याकडेही रात्रीची संचारबंदी अंमलात आली आहे. ओमिक्रॉनचा फैलाव दिवसेंदिवस वाढतो आहे. सरकारी पातळीवर उपाययोजनांच्या चर्चा सुरू आहेत. बैठका होताहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन नवे निर्बंध लागू हात आहेत. नव्या वर्षाची सुरुवात ही अशी वेगळ्याच परिस्थितीत होत आहे. गेल्या वर्षी हेच झालं होतं. ते वर्षं आपण सगळेच चाचपडत-धडपडत जगलो. मागोमाग पुढचं वर्षही त्याच वाटेनं सरलं. एकूणच, आपल्या आनंदाला आता मर्यादा आल्या आहेत. पण मानवजातीच्या भल्यासाठी आता तरी त्या अपरिहार्य ठरल्या आहेत.
महामारीच्या संकटानं माणसांच्या जगण्याची उतरंड आणखी एकदा मोडून टाकू नये, यासाठी आता दक्षता म्हणून बंधनं पाळावीच लागणार आहेत. आपण सगळेच उत्सवप्रिय असतो. आपल्याला त्यासाठी नवनवी कारणं हवी असतात. नव्याचं स्वागत ही माणसांची संस्कृती आहे. पहिल्यावहिल्याचं आपल्याला अप्रूप असतं, कोडकौतुक असतं. आपलं आयुष्य निसर्गाचं बोट पकडूनच चालत असतं. म्हणूनच निसर्गातल्या नवेपणाशी-बदलांशी आपला आनंद आणि उत्साह जोडला आहे. निसर्गातल्या बदलांच्या प्रत्येक टप्प्यावर आपले सण-समारंभ असतात. पूर्वजांनी सणांची रचना तशीच केली आहे. आपण मुळातच निसर्गपूजक आहोत. म्हणूनच आपण मृगाच्या पावसाचं स्वागत करतो. ओढ्यांना-नद्यांना आलेल्या पहिल्या पुराच्या पाण्याचं स्वागत आपण खणानारळानं ओटी भरून करतो. नवं पीक पेरताना नारळ वाढवून आणि हळद-कुंकू वाहून आपण त्याची पूजा करतो. तयार झालेलं पीक शेतातून काढून खळ्यावर नेताना तिथेही पूजा करतो; आणि ते घरात आणतानाही त्याचा आनंद साजरा करतो. आपले अनेक सण अशा हंगामांशी जोडलेले आहेत. झाडांवर बहरलेल्या मोहराचं आपल्याला आकर्षण असतं. पाडाच्या आंब्याचं कौतुक असतं. आपण तुलसी विवाह करतो आणि आवळी भोजनाचाही समारंभ करतो. त्या त्या वेळची पिकं तेव्हाच्या सणांमध्ये हमखास येतात. कधी पूजेसाठी, कधी नैवेद्यासाठी तर कधी सजावटीसाठीसुद्धा.
आपल्या संस्कृतीत झाडांची पूजा आहे. भूमीची पूजा आहे. जलाची पूजा आहे. रथसप्तमीला दूध उतू घालवून आपण सूर्यदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्याकडे शस्त्रांची पूजा आहे. जनावरांचेही सण आहेत. आपण वनदेवतेला नैवेद्य अर्पण करतो. पहिला घास अग्नीला देतो. होलिकोत्सवात तर आपण होळीला पुरणपोळी देऊन तृप्त करतो. वर्षप्रतिपदेला गुढ्या उभारून आपण मराठी नववर्षाचा सण साजरा करतो. हे सगळे सोहळे आयुष्य सुखी-समाधानी आणि आनंदी करतात. मनाची मरगळ झटकून टाकतात. ही कृत्यं करताना या संस्कृतीवर आपली श्रद्धा आहे.
नव्या वर्षाची संकल्पना रुजली सुमारे चार हजार वर्षांपूर्वी. प्राचीन बॅबिलॉन संस्कृतीत. तिथेही निसर्गाचाच संबंध आहे. हे नवं वर्षं तेव्हा वसंत ऋतूमध्ये सुरू होई. त्याला ङ्गअकितूफ म्हणत. तो वसंतोत्सव म्हणूनच ओळखला जाई. अकितू हा सुमेरियन शब्द आहे. त्याचा अर्थ आहे बार्लीचं पीक. मार्चच्या उत्तरार्धात हे पीक तयार होई आणि घरोघरी आणलेलं असे. घर पिकानं भरलेलं असे. त्याचा आनंद या उत्सवात दिसत असे. हे नवं वर्षं सुरू व्हायचं एकवीस मार्चला. त्या दिवशी दिवस आणि रात्र समसमान असतात. तो त्या वर्षाचा प्रारंभ दिवस असे. तेव्हाचं कॅलेंडर दहा महिन्यांचं आणि 304 दिवसांचं असे. मार्च हा पहिला महिना, म्हणूनही तो वर्षारंभ. जानेवारी आणि फेब्रुवारी महिने त्यात नंतर समाविष्ट करण्यात आले. राजा ज्युलिअस सीझरनं आपल्या राज्यातले खगोलअभ्यासक आणि गणितज्ञ यांच्याशी चर्चा करून बारा महिन्यांचं ज्युलिअन कॅलेंडर अमलात आणलं. सीझरनं नववर्षाचा प्रारंभ एक जानेवारीला होणार असं ठरवून टाकलं; आणि तीच प्रथा रूढ झाली. आजही तीच सुरू आहे.
जगाच्या पाठीवर सगळीकडंच एक जानेवारीला नवं वर्ष सुरू होत नाही. जिथली तिथली संस्कृती, ऋतूंचे बदल आणि हवामान यांनुसार नववर्षाचा प्रारंभही बदलता आहे. नववर्षाचं स्वागत जल्लोषात करायचा प्रघात मात्र तेव्हापासूनचाच. आता कोरोनानं हे संदर्भ बदलून टाकले. आता नववर्षाच्या स्वागताचा आनंद आपल्याला कुटुंबातच साजरा करावा लागतो आहे. एरवी मध्यरात्री जल्लोषी गर्दीनं ओसंडून जाणारे रस्ते संचारबंदी असल्यानं या वर्षी सुने सुने होते. गेल्या दोन-एक वर्षांमध्ये आपण सक्तीचं एकटेपण जगायला शिकलो आहोतच. महामारीच्या संकटानं आपल्याला संयमाचं महत्त्व पटवून दिलं आहे. अशी बदलती जीवनशैली आता आपला मोठा आधार बनली आहे. तिच्याशी जुळवून घेतच आपल्याला वाटचाल करायची आहे.
आनंदाला मर्यादा घातल्या, तरी आनंद तो आनंदच! नवा दिवस, त्याचा प्रत्येक क्षण आनंदी करण्याचा, आश्वासक करण्याचा प्रयत्न तर आपल्याच हाती आहे. हे सामाजिक भान जागं ठेवून नव्या वर्षाचं स्वागत आपण केलं. पुढच्या काळातही असंच भान बाळगावं लागणार आहे. शेवटी, माणसाचं आयुष्य म्हणजे तरी काय? ऊन-पाऊस. सुख-दु:ख. अंधार-उजेडाचा लपंडाव. चढ-उताराचा अनुभव. अशा गतीशी जुळवून घेणं म्हणजेच समाधानानं जगणं. समरसून जगणं. निसर्गाशी एकरूप होऊन जगणं. त्याची पूजा करीत जगणं. चला, सगळे त्यासाठी सज्ज होऊ.
नव्या वर्षा, आम्ही तुझं मनःपूर्वक स्वागत करत आहोत. त्यासाठी आमच्या तुलाही शुभेच्छा. हॅपी न्यू इयर!