Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारघरकुल घोटाळा : एका बनावट खात्यात आलेले अनुदान दुसर्‍या बनावट खात्यात वर्ग

घरकुल घोटाळा : एका बनावट खात्यात आलेले अनुदान दुसर्‍या बनावट खात्यात वर्ग

नंदुरबार | दि. १५ | प्रतिनिधी – NANDURBAR

उमराणी बु.ता.धडगाव (Dhadgaon) येथील रमेश सोन्या ठाकरे या लाभार्थ्याच्या नावाने मांडवी येथील सेंट्रल बँकेत (Central Bank) दोन बनावट खाते उघडण्यात आले आहेत. यातील एका बनावट खात्यात घरकुलाचे १ लाख २० हजार रुपये आले आहेत तर ती रक्कम दोन वेळा प्रत्येकी १० हजाराची रक्कम एटीएमने काढण्यात आली असून उर्वरित रक्कम त्यांच्या दुसर्‍या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे सदर लाभार्थ्याने घरकुलाचा लाभ घेतल्याची शासन (Government) दप्तरी नोंद तर आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याला घरकुलही मिळालेले नाही आणि अनुदानाचे पैसेही मिळालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थी हा घरकुलापासून कायमस्वरुपी वंचितच राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम…

उमराणी बु.ता.धडगाव येथे प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल न बांधता लाभार्थ्याच्या नावाने दुसर्‍याच व्यक्तीकडून अनुदान हडप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या नावे अनुदान हडप करण्यात आले आहे, ते लाभार्थी या प्रकाराबाबत पूर्णतः अनभिज्ञ आहेत. त्यांच्या नावाने मांडवी येथील सेंट्रल बँकेत बनावट आधार क्रमांक, बनावट रेशन कार्ड वापरुन खाते उघडण्यात आले आहेत. त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करुन अनुदान हडप करणारी टोळीच सक्रीय असल्याची माहिती समोर येत आहे.

उमराणी येथील रमेश सोन्या ठाकरे हे सध्या कच्च्या घरात राहत आहेत. प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना १४ डिसेंबर २०२० ला घरकुल मंजूर झाले असून त्यांचा घरकुल रजिस्टर नंबर एमएच १९३७२०६ असा आहे. दि.२ जून २०२१ रोजी त्यांच्या मांडवी येथील सेंट्रल बँकेतील एका खात्यात १ लाख २० हजार रुपये पडले आहेत.

प्रत्यक्षात त्यांचे घर अद्यापही बांधले गेलेले नाही. अधिक माहिती घेतली असता रमेश सोन्या ठाकरे यांचे कच्चे घर ज्या ठिकाणी होते त्याचठिकाणी त्यांना पक्के घर बांधायचे होते. मात्र, यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हेदरम्यान संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या पहिल्या फोटोत रमेश ठाकरे यांची पत्नी मेलदीबाई ही त्यांच्या स्वतःच्या कच्च्या घरासमोर उभी आहे.

दुसरा फोटो नवीन घर बांधण्यासाठीच्या जागेचा आहे. ती जागा घरापासून १५ फुट अंतरावर आहे. हे दोन्ही फोटो योग्य असून ते दि.२७ जून २०२० रोजी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. काम पूर्ण झाल्याचे फोटो दि.८ सप्टेंबर २०२१ रोजी अपलोड करण्यात आले आहेत.

ती जागा मात्र वेगळी असून लिंटल लेव्हल व प्लिथं लेव्हलचा फोटो हा धडगाव येथील काकावाडीतील आहे. शेवटचा काम पूर्ण झाल्याच्या फोटो हा लहान उमराणी मंदिराजवळचा असून ते पक्के घर शिलदार नारसिंग पावरा यांचे आहे. शेवटच्या तीन ठिकाणी उभी असलेली व्यक्ती बाजीराव सोन्या पावरा असल्याचे समजते.

सद्यस्थितीत सदर लाभार्थी अद्यापही कच्च्या घरात राहत आहे. सदर व्यक्तीचे खाते उघडण्याचे काम करुन देतो असे सांगून काही जणांनी त्यांच्याकडून कागदपत्र नेले होते. रमेश सोन्या ठाकरे यांच्या नावाने बँक अकाउंट नंबर ३८४७६९५८९४ सेंट्रल बँक ऑफ इंडीया, शाखा मांडवी येथे उघडण्यात आले.

त्यावर १ लाख २० हजार रुपये एवढी रक्कम पडली आहे व ती रक्कम काढली गेली आहे. सदर रक्कम ही मूळ लाभार्थ्याने काढलेलीच नाही. ते गुजरात राज्यात मजुरीकरिता सातत्याने बाहेरच आहेत. त्यामुळे या अकाउंटचे व्यवहार रमेश सोन्या ठाकरे यांनी केलेले नाहीत.

सदर खात्यात २ जून २०२१ ला एकत्रीतपणे १ लाख २० हजार एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यानंतर सदरचे खाते बंद करुन रक्कम दुसरे त्यांच्याच नावे असलेले खाते क्रमांक ५१२०२६२५६६ या खात्यात परिवर्तीत करण्यात आली आहे.

आता हे दोन्ही बँक खाते कोण ऑपरेट करत आहे? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, यामुळे शासनाच्या नोंदीत रमेश ठाकरे यांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. पुन्हा लाभ घेण्यासही ते पात्र राहिलेले नाहीत. प्रत्यक्षात त्यांना पैसेही मिळाले नाहीत आणि घरकुलही मिळाले नाही. त्यामुळे ते घरकुलापासून कायमस्वरुपी वंचित राहण्याची शक्यता आहे.

असाच प्रकार पिंटया सोन्या ठाकरे यांच्याबाबतीतही घडला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर घरकुलाचा नंबर एमएच१८९५२६३ आहे. सदर प्रकरणही १४ डिसेंबर २०२० रोजी मंजूर झाले होते. त्यांच्या नावानेही सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मांडवी येथील खाते क्र. ३८४७३२९३२७ वर दि.२ जून २०२१ रोजी १ लाख २० हजार एवढी रक्कम पडली आहे.

परंतु मूळ लाभार्थ्याने सदर रक्कम काढलेली नाही. तसेच त्यांच्याही ऑनलाईन टाकण्यात आलेल्या फोटोपैकी २७ जून २०२० रोजी जुन्या कच्च्या घराचे फोटो टाकले आहेत. ते योग्य असून त्यानंतरच्या लेव्हलचे फोटो हे दुसर्‍या लोकेशनचे आहेत.

ते ५ सप्टेंबर २०२१ रोजी अपलोड केलेले असून त्यातही गोंधळ आहे. अशोक दाज्या ठाकरे (मयत) यांचा घरकुल आवास मंजुरी क्र.एमएच१९३९२८० आहे. तसेच राज्या दाज्या ठाकरे यांचेही घरकुल आवास योजनेत मंजूर झाले होते. त्याचा क्रमांक एमएच १९३९२३७ आहे. या सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला गेल्याची शासन दप्तरी नोंद आहे.

प्रत्यक्षात त्यांना घरकुल मिळालेले नाही आणि अनुदानाची रक्कमही मिळालेली नाही. त्यामुळे घरकुल अनुदान हडप करण्याच्या या प्रकारात मोठी टोळीच सक्रीय असण्याची शक्यता आहे. या टोळीचा पर्दाफाश करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खर्‍या लाभाथ्यार्ंकडून होत आहे.

Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम…

घरकुल अनुदानाच्या या कथित घोटाळयाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे पथक तयार करण्यात आले आहे. काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्यात आला आहे तर काही ठिकाणी त्यांच्या संमतीने त्यांच्या खात्यावरुन गैरप्रकार झाल्याचे दिसते आहे. तरीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. कोणीही दोषी आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

– रघुनाथ गावडे,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, नंदुरबार

- Advertisment -

ताज्या बातम्या