अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील घाटघर येथील आरोग्य पथकाची इमारत ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे अनेक दिवसांपासून काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. ही इमारत धुळ खात पडलेली आहे. जर या ईमारतीचे काम लवकर पुर्ण झाले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा घाटघरचे सरपंच पोकळे यांनी दिला आहे.
आदिवासी तालुका म्हणून अकोले ची ओळख आहे. विशेषतः अकोलेच्या पश्चिमेला आदिवासी बांधवाचे सर्वात जास्त वास्तव्य असुन आदिवासी बांधवांच्या सुविधेसाठी शासनाकडुन मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असतात. विविध प्रकारच्या योजना आदिवासी बांधवासाठी राबविल्या जातात. अशाच एक योजनेचा भाग म्हणुन घाटघरच्या आरोग्य पथकासाठी एक टोलेजंग ईमारत घाटघर येथे उभारली जात आहे. गत पाच ते सहा वर्षांपासुन या ईमारतीचे काम सुरु असुन ईमारत पुर्ण सुद्धा होत आली आहे.
पंरतु काही काम अपुर्ण अवस्थेत असल्याने या ईमारतीचा ताबा अद्यापही आरोग्य पथकाकडे सोपविला गेलेला नाही. दिड कोटीचे हे काम असुन सुरुवातीपासुनच या कामासाठी वाळुचा वापर न करता ग्रीटचा वापर करण्यात आलेला आहे. ईमारतीच्या भिंतींना तडे गेलेले आहेत. खिडकीची तावदाने फुटलेली आहेत. प्लंबींगची कोणतीच कामे पुर्ण झालेली नाही. इमारतीची ईलेक्ट्रीक फिंटींगही अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.
ग्रामस्थांनी या ईमारतीचे कामकाज लवकर पुर्ण व्हावे म्हणुन अनेकदा पाठपुरावा केलेला आहे. तरीसुद्धा या ईमारतीच्या कामाला अद्यापही मुहुर्त लागण्याचे चिन्हच दिसत नाही. अतिदुर्गम डोंगराळ भागात सदर ईमारतीचे काम सुरु असल्याने शासकिय अधिकारी सुद्धा या कामाकडे फिरकत नाही. सदर ईमारतीच्या कामावर देखरेख करणा-या अधिकार्यांना या ईमारतीच्या कामाविषयी छेडले असता ईमारतीच्या कामासाठी वाळु उपलब्ध नसल्या कारणाने ईमारतीचे काम बंद आहे असे सांगितले.
घाटघर हे गाव सह्याद्री पर्वत रांगतील अतिदुर्गम भागात असल्याकारणाने अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव आहे. येथील रुग्णांना दवाखाण्यात जाण्यासाठी येथील पथकाखेरीज शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचाही सहारा घ्यावा लागतो. ही ईमारत जर लवकर पुर्ण झाली तर निश्चितच घाटघर येथील नागरीकांना आरोग्याच्या प्रश्नांसाठी बाहेरगावी जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
आत्ताच्या कालावधीत घाटघर येथील आरोग्य पथकासाठी डॉ. गोयल यांच्यासह त्यांचे कर्मचारी त्यांच्या राहत्या निवास स्थानातच रुग्णांना सेवा देत असतात. निवास्थानाची ही ईमारत सुद्धा पावसाळ्यात कायम स्वरुपी गळत असते. जर नविन ईमारत लवकर आरोग्य पथकाच्या ताब्यात दिली गेली तर नक्कीच रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सुलभ होणार आहे. या ईमारतीचे काम केव्हा पुर्ण होणार असा सवाल घाटघर ग्रामस्थांनी केला आहे.