मुंबई | Mumbai
मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील लोखंडी होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४० बाय १४० चौरस फुटांचा हा फलक काही सेकंदात कोसळल्याने पेट्रोल पंपावरील वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत ७४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण जखमींची संख्या ८८ झाली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
अवकाळी पावसामुळे घाटकोपरमध्ये काल (१३ मे) पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळले आहे. यामध्ये अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. वादळी वाऱ्यामुळे या पंपावरील होर्डिंग खाली कोसळले होते. या घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग
पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, बीपीसीएल, महानगर गॅस आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या प्राधिकरणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. लोखंडी होर्डिंग असल्याने त्याला हटवण्याला वेळ लागत होता. त्यामुळे बराच वेळ मदतकार्य सुरूच होऊ शकले नाही. याच दरम्यान किरकोळ मार लागलेल्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, होर्डिंग हटवण्याचे काम अद्याप ही सुरु असून अद्याप काही जण या होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफ टिमकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस काल मुंबईत पाहायला मिळाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या होर्डिंगखाली अनेक वाहने देखील दबली होती. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
होर्डिंग अनधिकृत असल्याचा दावा?
ज्या जागेवर कोणतीही नियम न पाळता हे अनधिकृत होर्डिंग उभे करण्यात आले होते ती जागाच मुळात रेल्वे पोलिसांची आहे, जो पेट्रोल पंप या ठिकाणी चालवण्यात येतात तो देखील रेल्वे पोलिसांचा होता, या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या सगळा महसुल हा रेल्वे पोलिसांना आणि काही प्रमाणात पेट्रोल पंप चालवत असलेल्या मालकाला जात होता, ही अतिशय धक्कादायक अशी माहिती आता समोर आलेली आहे. तसेच, हे होर्डिंग अनधिकृत आहे नियम धाब्यावर बसवून उभारले जात आहे याची कल्पना रेल्वे पोलिसांना नव्हती का? असाही सवाल आता उपस्थित होतोय.