Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशOnline Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची आत्महत्या,...

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची आत्महत्या, काय आहे हा जीव घेणारा गेम?

गाझियाबाद । Ghaziabad

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी सोसायटीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून या तिघींनी आपली जीवनयात्रा संपवली. १५, १४ आणि १२ वर्षांच्या या मुली एका धोकादायक कोरियन ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्या होत्या, ज्याचा शेवटचा टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

मंगळवारी रात्री साधारण २.१५ वाजता भारत सिटी येथील एका टॉवरमध्ये ही घटना घडली. निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) या तिन्ही बहिणींनी आपल्या राहत्या फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी घेतली. मोठ्या आवाजा मुळे सोसायटीतील नागरिक जमा झाले, तेव्हा तिघीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

YouTube video player

मुलींच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघीही गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून एक कोरियन ऑनलाइन गेम खेळत होत्या. या गेममध्ये ५० दिवसांत पूर्ण करण्यासाठी ५० वेगवेगळे टास्क दिले जात असत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ५० वा आणि शेवटचा टास्क आत्महत्या करण्याचा होता. मुलींनी पहाटे २ वाजता हा टास्क पूर्ण करण्यासाठी नवव्या मजल्यावरून उडी घेतली. फॉरेन्सिक पथकाने मोबाईलची तपासणी केल्यानंतर गेमिंगमुळेच ही आत्महत्या झाल्याचे स्पष्ट केले आहे.

आत्महत्येपूर्वी मुलींनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यातून त्यांचे कोरियन संस्कृती आणि गेमबद्दलचे वेड दिसून आले. “आम्हाला माफ करा, आम्ही कोरियन गेम सोडू शकत नाही. कोरियन भाषा आपले जीवन आणि सर्वकाही आहे. तुम्ही आम्हाला त्यापासून वेगळे करू शकत नाही, म्हणून आम्ही आमचे जीवन सोडून देत आहोत,” असे त्यांनी या नोटमध्ये नमूद केले आहे. त्यांना वारंवार दक्षिण कोरियाला जाण्याची ओढ लागली होती, असेही वडिलांनी सांगितले.

घरातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही बहिणींमध्ये प्रचंड एकोपा होता. १४ वर्षांची मधली मुलगी या गेममध्ये ‘कमांडर’ किंवा ‘बॉस’च्या भूमिकेत होती. मोठी आणि धाकटी बहीण तिच्या प्रत्येक सूचनेचे काटेकोरपणे पालन करत असत. इतकेच नाही तर त्या जेवायला किंवा अगदी शौचालयातही एकत्र जात असत. शाळा सोडल्यानंतर या तिघींनी स्वतःला एका खोलीत बंदिस्त करून घेतले होते आणि त्या सतत गेममध्ये मग्न असायच्या.

मुलींच्या वडिलांनी रडत माध्यमांना सांगितले की, त्यांच्या मुली ऑनलाइन गेम खेळतात हे त्यांना माहित होते, मात्र तो इतका जीवघेणा असेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. “कोणता बाप आपल्या मुलांना मरण्याची परवानगी देईल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुली नापास झाल्यामुळे दोन वर्षांपासून शाळेत जात नव्हत्या आणि आई-वडील खोलीत आले की त्या मोबाईल लपवून बाहेर जात असत.

कोरियन लवर गेम हा एक प्रकारचा रोमँटिक सिम्युलेशन गेम असतो, ज्यात खेळाडू गेममधील कोरियन-स्टाइल पात्रांसोबत संवाद साधतो आणि आपल्या निर्णयांद्वारे कथा पुढे नेतो. यात डायलॉग आणि पर्याय दिले जातात. यातून निवड करून खेळाडू मैत्री, प्रेम किंवा नातेसंबंधांची दिशा ठरवतो आणि त्याच निर्णयांवरून कथा आणि तिचा शेवट बदलतो. हे गेम प्रामुख्याने मोबाइलवर खेळले जातात, सोपे कंट्रोल्स आणि स्टोरी-आधारित असतात. ज्यांना रोमँटिक कथा, के-ड्रामा किंवा के-पॉप सारखे वातावरण आवडते ते लोक हे खेळू शकतात. सामान्यतः हे टीनएजर्स आणि प्रौढांसाठी असते आणि कंटेंट हलके-फुलके रोमँटिक असते.

कोरियन लवर गेममध्ये टास्क हे छोटे-छोटे काम असते जे कथा पुढे नेण्यासाठी आणि पात्रांसोबत नाते मजबूत करण्यासाठी करावे लागतात. यात सामान्यतः एखाद्या पात्राशी संवाद साधणे, योग्य डायलॉग निवडणे, डेट किंवा मीट-अप पूर्ण करणे, मेसेजला उत्तर देणे किंवा एखादा खास सीन अनलॉक करणे यांचा समावेश असतो. काही गेम्समध्ये रोज लॉग-इन करणे, गिफ्ट देणे किंवा मिनी-गेम खेळणे हेही टास्क असतात. हे टास्क पूर्ण केल्याने कथा पुढे उघडते, नवीन सीन मिळतात आणि वेगवेगळ्या एंडिंगपर्यंत पोहोचता येते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या तीन बहिणींनाही गेममध्ये टास्क मिळाला होता. हा टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला जीव गमावला. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या तिघींना ‘लव गेम’ नावाच्या कोरियन ऑनलाइन गेमचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. पालक त्यांच्या गेमिंगवर आक्षेप घेत असल्याने आणि गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असावे. या घटनेमुळे ऑनलाइन गेमिंगच्या धोक्यांबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापराकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री

“माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे” शिंदे सेनेच्या आमदाराचे...

0
सांगली | Sangliजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी...