नेवासा (का. प्रतिनिधी)-
#नगर जिल्ह्यात मोठे व प्रसिद्ध असलेले #नेवासा_कृषी_उत्पन्न_बाजार समितीचे कांदा मार्केट मागील दीड महिन्यापासून बंद असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना कांदा विकायचा कुठे? असा प्रश्न पडला आहे.
#घोडेगाव कांदा मार्केटमुळे नेवासा तालुक्यातील शेतकर्यांची कांदा विक्रीची सोय झाली. अन्य तालुक्यातील शेतकर्यांचा कांदाही या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो.
औरंगाबाद-पुणे महामार्गावरील कांदा मार्केट असल्यामुुळे येथे मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी येतात त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे सर्वांकडून पालन करुन घेणे कठीण बनते. शेकडोंच्या सख्येने वाहनांतून कांदा येतो. त्याचबरोबर प्रत्येक वाहनांचे चालक, समवेत शेतकरी यामुळे मोठी गर्दी होते. यातूनच करोनाचे संक्रमण होण्याचा धोका वाढतो.
घोडेगावातील अनेक व्यापार्यांना त्यामुळे करोनाचे संक्रमण झाले. घोडेगावचे कांदा मार्केट मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच बंद करण्यात आले ते अद्यापही बंदच आहे.
मार्केट बंद असल्याने शेतकर्यांना कांदा विकायचा कुठे? असा प्रश्न पडला आहे. ज्यांच्याकडे कांदा साठवण्यासाठी चाळींची सोय आहे अशा शेतकर्यांनी कांदा साठवून ठेवला. परंतु साठवणुकीची सोय नसलेले शेतकरी कधी मार्केट सुरु होतेय याची वाट पाहात अहेत. त्यातच अधूनमधून अवकाळी पावसाचे वातावरण तयार होत असल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे.
पारनेर बाजार समितीतील कांदा खरेदी-विक्री बंद
यावर्षी अनेक शेतकर्यांचा कांदा कमी दर्जाचा व टिकवणक्षमता कमी असलेला आहे. त्यामुळे हा कांदा लवकर विकावा लागणार आहे. अन्यथा तो सडण्याचा धोका आहे.
सध्या व्यापार्यांकडून थेट शेतकर्यांच्या शेतातच कांदा खरेदीही केली जात असली तरी त्याचे प्रमाण व मिळणारा भाव हा खूप कमी असल्याने कांदा मार्केट कधी सुरु होतेय याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.
गेल्यावर्षीही लॉकडाऊन काळात मार्केट बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर गर्दी टाळण्यासाठी ठराविक मर्यादेत अगोदर नोंदणी करुन कांदा खरेदी सुरु करण्यात आली होती. यावर्षीही त्यापद्धतीने का होईना कांदा खरेदी सुरु करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.