Tuesday, March 25, 2025
Homeनगरघोडेगाव कांदा मार्केट राज्यात अग्रेसर बनवणार

घोडेगाव कांदा मार्केट राज्यात अग्रेसर बनवणार

आमदार शंकरराव गडाख || विकास कामांना खोडा घालण्याचा उद्योग थांबवा

नेवासा |प्रतिनिधी|Newasa

घोडेगाव कांदा मार्केटला राज्यात अग्रेसर कांदा मार्केट बनवणार असल्याची ग्वाही आमदार शंकरराव गडाख यांनी दिली. राजकारण करताना विरोधकांनी तालुक्याच्या हिताला प्राधान्य देऊन विकासकामांना खोडा घालण्याचा उद्योग थांबविण्याचे आवाहनही त्यांनी केले. नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात 16 कोटी रुपये खर्चातून काँक्रीटीकरण होत आहे. त्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, सचिव देवदत्त पालवे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

आमदार गडाख यांनी बाजार समितीच्या कारभाराचा आढावा घेऊन एकेकाळी कर्मचार्‍यांचे पगार करण्यास असमर्थ असलेल्या बाजार समितीची आज राज्यातील मोजक्या अग्रगण्य बाजार समित्यांमध्ये गणना होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संचालक मंडळ, कर्मचारी, हमाल, मापाडी, सफाई कामगार यांची मेहनत तसेच घोडेगाव ग्रामस्थांसह व्यापारी, शेतकर्‍यांनी सकारात्मक साथ दिल्यामुळेच बाजार समितीची प्रगती झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. घोडेगाव उप आवारातील जनावरांचा बाजार, कांदा मार्केटमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून यामाध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्याने राजकीय विरोधकांनी जबाबदारीने वागण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपल्या राजकीय विरोधकांनी राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन राज्यातील सत्ता बदलाच्या समिकरणाचा गैरफायदा घेऊन तालुक्यातील विकासकामांना खोडा घालण्याचे अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण खेळल्याची खंत आमदार गडाख यांनी यावेळी व्यक्त केली. विरोधकांनी आपल्या नेतृत्वाखाली कार्यरत मुळा कारखाना, मुळा एज्युकेशन, दूध संघ, नेवासा बाजार समिती, शनैश्वर देवस्थान, मुळा बँक आदी संस्थांवर बेछूट आरोप करून सत्तेचा गैरवापर करत नाहक चौकशा लावल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. मात्र सर्वच संस्थांचा कारभार चोख आढळल्याने निमूटपणे क्लीन चीट देण्याची नामुष्की शासकीय यंत्रणावर ओढवल्याची बाब त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.

विरोधकांच्या खोडा घालण्याच्या प्रवृत्तीमुळे मोठी संधी मिळूनही तालुक्याचा अपेक्षित विकास साधता न आल्याची खंत व्यक्त केली. घोडेगावच्या कांदा मार्केटला राज्यात अग्रेसर कांदा मार्केट बनवणार असल्याचे आ.गडाख म्हणाले. हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिल्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हमाल तसेच महिला सफाई कामगारांनी यावेळी आमदार गडाख यांचा हृदय सत्कार केल्याने उपस्थित भारावून गेले.

वाढपी आपला हवा
एकीकडे एफआरपीसाठी आग्रह धरणारे शासन दुसरीकडे एमएसपीवर निर्णय घेत नसल्याच्या दुटप्पी धोरणामुळे साखर कारखानदारी धोक्यात आली असून राज्यात एकमेव मुळा कारखान्याला राजकीय द्वेषातून मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनात वाढप्या आपला पाहिजे, असे सूचक विधान माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले. आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शांतता आहे, मात्र तरीही सावधगिरी बाळगून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...