सोनई |वार्ताहर| Sonai
48 कोटींची घोडेगाव पाणी योजना राजकीय सूडबुद्धीने बंद पाडल्याच्या निषेधार्थ घोडेगाव ग्रामस्थांनी आ. शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांच्या उपस्थितीत रास्ता रोको व गाव बंद आंदोलन करून प्रशासनास धारेवर धरले. घोडेगाव पाणी योजनेला जलसंपदा इमारत अडसर ठरत आहे. मंत्रालयात ही फाईल धूळखात पडून आहे. कुणामुळे हा प्रस्ताव मार्गी लागत नाही याची मोठी चर्चा तालुक्यात होत आहे. स्थानिक विरोधकानीं गडाख यांची कोंडी केली आहे, असेही बोलले जात आहे.
आ. गडाख मंत्री असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार काळात जलसंपदा विभागाची जागा पाणी योजनेच्या टँकसाठी मिळवली प्रत्यक्ष कामासह सुरुवात झाली. परंतु सत्ता बदल होताच घोडेगाव येथील आ.शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विरोधकांनी आ.गडाख यांनी मंजूर करून आणलेल्या योजनेचे काम पूर्णत्वास येऊ नये यासाठी प्रशासनाला हाताशी धरून खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू केला.अवघ्या काही दिवसांत जलसंपदा विभागाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीचे निर्लेखन होऊन सदर इमारत पडण्यास जलसंपदा विभागाने परवानगी देणे आवश्यक असताना घोडेगाव येथील आ. गडाखांच्या स्थानीक विरोधकांनी जलसंपदा विभागावर वेगवेगळ्याप्रकारे दबाव टाकून सदर इमारती पाडण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ केली.
तब्बल 6 ते 7 महिने उलटूनही सदर प्रस्ताव राजकीय दबावामुळे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. आंदोलन होऊन 7 दिवस उलटूनही गेले तरी अजूनही सदर इमारत पाडण्याची परवानगी स्थानिक विरोधकांनी खो घातल्याने मिळाली नाही. जाणीवपूर्वक आ.गडाख यांचे स्थानिक विरोधक पाणीयोजनेत आडकाठी घालून सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत आहेत.
अनेक वर्षांपासून घोडेगाव ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. प्रत्येक निवडणुकीला सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून फक्त आश्वासन दिले जात होते. आ. गडाख यांनी मागील निवडणुकीत पाणी मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी सुमारे 48 कोटींची पाणी योजना मंजूर करून आणली व कामही चालू झाले पण गडाख यांना श्रेय मिळू नये यासाठी या पाणी योजनेत अडथळा आणला जात आहे.