Friday, November 22, 2024
Homeनगरघोगरगावात वाळूतस्करांचा हजारो ब्रास वाळूवर डल्ला

घोगरगावात वाळूतस्करांचा हजारो ब्रास वाळूवर डल्ला

रस्ते, शेतकर्‍यांच्या पाईपलाईन उखडल्या || गुंडांच्या सशस्त्र टोळ्यांचा नंगानाच

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील महसूल अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने घोगरगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात 15 दिवसांपासून वाळूतस्करांनी हैदोस घालत लाखो ब्रास वाळूवर डल्ला मारला आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहेच, शिवाय शेतकर्‍यांच्या पाईपलाईन उखडल्या असून रस्त्यांची वाट लागली आहे. वाळूतस्करीतून मिळालेल्या पैशाच्या जोरावर तालुक्यात गुंडाच्या सशस्त्र टोळ्यांचा नंगानाच सुरू असून या प्रकारावर घोगरगाव ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत गरज भासल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

याबाबत समजलेली माहिती अशी, नेवासा तालुक्यातील घोगरगाव शिवारातील नदीपात्रात पंधरा दिवसांपासून तालुक्याबाहेरील कुख्यात वाळूतस्करांच्या टोळक्याने ठाण मांडलेले आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने नियमबाह्यपणे त्यांच्याकडून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. याठिकाणी वाळूतस्कर वाळू काढण्यासाठी सज्ज होण्यापूर्वीच ग्रामस्थांनी तालुक्याच्या महसूल विभागासह पोलीस प्रशासनाला कळविले होते. या तस्करांनी पंधरा दिवसांत रात्रंदिवस शेकडो अजस्त्र वाहनांच्या माध्यमातून लाखो ब्रास वाळूउपसा करत वाळू चोरुन नेल्यानंतरही तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याबद्दल घोगरगाव ग्रामस्थांच्यावतीने आश्चर्य व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे नेवासा तहसीलदारांचा मोबाईल चार दिवसांपासून बंद असल्याने सामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? असा प्रश्न आहे.

घोगरगाव शिवारात विस्तीर्ण अशा गोदावरी नदीपात्रातून 15 दिवसांपासून रात्रंदिवस 24 तास अविरतपणे बेसुमार वाळू उपसा करण्यात आला आहे. याठिकाणाहून शेकडो अजस्त्र वाहने गाव परिसरातील रस्त्यांवरून भरधाव धावत असल्याने या परिसरातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. तसेच वाळूतस्करांच्या या अजस्त्र वाहनांमुळे शेतकर्‍यांच्या पाणी योजनांच्या पाईपलाईन फुटून मोठे नुकसान झालेले आहे. याठिकाणी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याला या वाळूतस्करी करणार्‍या वाहनांच्या वर्दळीमुळे कमरेऐवढे खोल खड्डे पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वाळूतस्करांच्या वाहनांच्या धडकेमुळे काही ठिकाणी विजेचे पोल पडले असून यामुळे नदी पात्रालगताचा भाग अंधारात बुडाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. वाळूतस्करांच्या एका वाहनांच्या धडकत महादेव मंदिर परिसरातील डीपीला जोराची धडक बसली. यामुळे संबंधीत डीपी जळून खाक झाल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

या परिसारातील महादेव मंदिर भागत एरवी असणारी मोठी वर्दळ वाळूतस्करांच्या सुळसुळाटामुळे कमी झाली आहे. बेकायदा बेसुमार वाळू उपसा तसेच भरधाव अंदाधुंद वाहतुकीबाबत ग्रामस्थांनी संबंधितांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्हाला महसूल, पोलीस यंत्रणेचा वरदहस्त असून आमचे कोणीही काही करू शकत नाही, असे म्हणत आमची तक्रार केल्यास पाहून घेवू. गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात संबंधीत गुंड आणि वाळूतस्कर परिसरात दहशत माजवत आहे. हा प्रकार केवळ महसूल आणि पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे घडत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला महसूल प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महसूल व पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्थेचे आव्हान
जिल्ह्यात अन्य तालुक्यात मुसक्या आळवलेली वाळूतस्करी आणि त्यातून निर्माण होणारी गुंडगिरी रोखण्यात महसूल आणि पोलिसांना यश आलेले असतांना घोगरगाव याला अपवाद कसे ठरत आहे? असा प्रश्न नेवासा तालुक्यातील जनतेला पडला आहे. तालुक्यात वाळूतस्करीला महसूलच्या कोणा कोणाचे आशीर्वाद आहे, या विषयी उलट-सुलट चर्चा सुरू असून तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्यासह नेवासा पोलिसांनी वेळीच हा प्रकार थांबवला नाही, तर तालुक्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. तालुक्यातील महसूलच्या बनवेगिरीकडे जिल्हा पातळीवरून महसूलने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या