मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..
लांब घोळदार पायपितचा अंगरखा, डोक्यावर शंकूच्या आकाराच्या कवड्यांची टोपी, गळ्यात माळा, कमरेला कवड्या लावलेला कंबरपट्टा, मनगटात कवड्यांच्या मनगट्या, अनवाणी, गळ्यात कवड्यांनी मढवलेली हळद-कुंकवाची पिशवी, डाव्या खांद्यावर लोंबणारी बुधली, एका काखेत झोळी, छातीवर देवीचा भला मोठा पितळी टाक, पायात घुंगरू, कपाळावर हळद- कुंकवाचा मळवट, हातात पेटता पोत, साथीला संबळ्या असा नाचत नाचत चालणारा एक कलाकार मुलांना दिसला. तेंव्हा संजयची पत्नी मुलांना सांगू लागली, लोकांसाठी व लोकांसंबंधीची लोकांनी रचलेली गीते म्हणजे लोकगीते, उत्कट भावनेने ओठावर येणारी गीते गाणारा देवीचा भक्त जो असतो तो म्हणजे भुत्या. माहूरची रेणुका देवी आणि तुळजापूरची भवानीमाता हे या भक्तांचे आराध्य दैवत. या भुत्यालाच भोप्या अथवा आराधी असेही म्हणत असत. हे सर्व देवीचे भक्त. गोंधळ्यांप्रमाणेच गोंधळ घालतात. मुले म्हणाली, हे नावच किती वेगळे आहे. आई मुलांना सांगू लागली, या भुत्यांबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरींनी खूप छान लिहिले आहे.
सहावी माझी ओवी गं
रामाच्या प्रहराला
आला आला गं भुत्या गात
माह्या दाराला
म्हणजे हे भुत्या अथवा भोप्या जसे देवीच्या मंदिराच्या बाहेर असतात तसेच ते घरोघर जात असत.
भुत्या हे लोककलाकार मुखाने सदैव देवीच्या आरत्या गात असायचे. कधी त्यांना आग्रह केला तर कथाही सांगायचे. विशेषत: घटस्थापनेच्या (नवरात्राच्या) कालावधीत हे भुत्ये गावोगाव फिरून देवीचा महिमा गायचे व नाचायचे. लोक या उपासकाच्या पोतावर तेल टाकायचे आणि घटात टाकलेली दक्षिणाही त्यांना म्हणजे भुत्यांना द्यायचे.
भुत्या होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा विधी पार पाडावा लागायचा आणि हा विधी भोपे पार पाडत होते. म्हणजे भुत्यांनाच भोपे जरी म्हणत असले तरी भोपे हे भुत्यांपेक्षा जरासे श्रेष्ठ असायचे. हे दोघेही देवीभक्त. या देवी भक्तांमध्ये भुत्या म्हणजे सेवक आणि भोपे म्हणजे राजे होते. घरोघरी फिरून धान्य व दक्षिणा घेऊन आपला उदरनिर्वाह करायचे. काही घरांमध्ये शंभर वर्षांपासून भुत्या लोककलाकारांची परंपरा चालत आलेली आहे. त्यांनी ती आजही जपून, टिकवून ठेवलेली दिसून येते.
लोकसंस्कृतीच्या या उपासकांनी समाजाच्या नव्या पिढीला दिशा देणारे काम केले होते. तरुणांनी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता आपली लोकसंकृती टिकवली पाहिजे, असे प्रबोधन ते करत. तथापि ही लोककला कालौघात हळूहळू अस्तंगत होत आहे. आता थोड्या प्रमाणात भुत्या हे देवींच्या मंदिराजवळ आढळतात.
संत एकनाथांच्या भुत्याने देहाहंकाराची वृत्ती टाकून देऊन भेदभावाला आणि द्वैैत बुद्धीला नाहीसे करून सत्वगुणांची आरती केली. त्या जगदंबेला भावभक्तीचा व सत्विचारांचा फुलवरा बांधला. म्हणूनच देवीची उपासना करून मनोरंजन करणे एवढी मर्यादित भूमिका न ठेवता संत भक्तांच्या रूपातील एकनाथांचा भुत्या हा एक श्रेष्ठ प्रबोधनकारक आहे.
जगदंबा ही आदिशक्तीच्या स्वरुपात तीन ठिकाणी वास करते. माहूर, सौदंती व तुळजापूर अशी यांची श्रद्धा असते.
भवानी मी तुझा भुत्या खरा ॥धृ॥
अनुहात चवंडक वाजत दगदग
होतो घोष बरा ॥1॥
बोधाची परडी, ज्ञानाचा संबळ अज्ञान तो पोत खरा ॥2॥
एकाजनार्दनी भुत्या मी जालो तुझे पायी मी खरा ॥3॥
भूत म्हणजे भूतकाळात गेलेला. हे भवानी, मी आधीच तुझ्यात विलीन झाल्यामुळे आता माझे अस्तित्व संपले. ते भूतकाळात गेले म्हणजे मी भूतकाळातच तुझ्यात विलीन झाल्यामुळे तुझा खरा भुत्या आहे.
आता माझ्या सर्वांगामधून सातत्याने आघातावाचून होणारा ध्वनी हाच जणू चवंडक (चौघडा) सारखा डुगडुग वाजत त्याचा घोष होत आहे.
मी तुझाच झाल्यामुळे अखंड बोधाची परडी माझ्या हातात आली आणि स्वरूप ज्ञानाचा संबळ वाजू लागला. त्या बोधाच्या घर्षणाने आणि ज्ञानाच्या अग्नीने अज्ञानरूपे खरा पोत जळू लागला. म्हणूनच जनार्दनांचे सेवक एकनाथ महाराज म्हणतात, हे भवानी, मी खर्या अर्थाने तुझ्या पायात विलीन झालो. तुझा भुत्या होऊन राहिलो, म्हणजे तूच होऊन राहिलो.
भुत्या होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. अखंड ब्रह्मचारी राहून भुत्या होता येत होते. फक्त ठराविक दिवशी जोगवा मागणारा व इतर दिवशी सर्वसामान्य जीवन जगणारा भुत्याही होता येत होते. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला देवीचे भक्त व सेवक समजत व कवड्यांची माळ धारण करत असत असा उल्लेख इतिहासात आढळतो. भुत्याच्या या संपन्न परंपरेने मराठी साम्राज्यावर अनंत उपकार केले आहेत. शिवरायांच्या सैन्यातील हेरांनी भुत्याचा वेष घेऊन हेरगिरी केली आणि स्वराज्य निर्मितीत मोलाचा वाटा उचलला.
असा सामाजिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या भुत्या आदर्श होता. महाराष्ट्रात कुलदेवीचा हा भक्त तुणतुण्याच्या तालावर अंबेचे गोडवे गात राहायला हवा. प्रबोधन, कथा, गीतांनी लोकजीवनाची गंगा अधिकाधिक पवित्र व्हायला आणि वाहती राहायला हवी. ही संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे.
संजय मुलांना म्हणाला, आईने किती छान पद्धतीने माहिती सांगितली. आजही काही प्रमाणात भुत्या असले तरीही ते आता लोप पावत असल्याचे आढळून येते. विकारांचा अहंकार नाहीसा करणारा भुत्या आपल्याला जगवायचा आहे, यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. मुलांनो, प्रथम हा भुत्या तुम्हाला शब्दातून जागवायचा आहे. त्याला मनात जपून ठेवून आता आपण दुसर्या लोककलाकाराकडे जाऊ.