Thursday, September 12, 2024
Homeनगरघुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातून कॉपरचे पाईप चोरणारी टोळी जेरबंद

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातून कॉपरचे पाईप चोरणारी टोळी जेरबंद

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमधील सेंट्रलाईज ऑक्सीजन पाईपलाईन व टर्मीनल चोरणार्‍या टोळीतील तिघा जणांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

- Advertisement -

संदीप उर्फ जग्या संजय वाल्हेकर (वय 24, रा. वेल्हाळे रोड, संगमनेर), निखील ऊर्फ अजय विजय वाल्हेकर (वय 19, रा. वेल्हाळे रोड) व सागर बाळू गायकवाड (वय 19, रा. साठेनगर, घुलेवाडी) अशी आरोपींची नावे आहे.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर मधून सेंट्रलाईज ऑक्सीजन पाईपलाईन व टर्मीनल हे चोरीला गेले होते. 12 लाख 61 हजार 029 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद शकुंतला आसाराम पालवे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली. सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप ऊर्फ जग्या संजय वाल्हेकर याने त्याच्या साथीदारांसह केला आहे. तो त्याच्या साथीदारांसह केशव तिर्थ मंदिर गंगामाई घाट, संगमनेर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर ठिकाणी जावून संदीप उर्फ जग्या संजय वाल्हेकर (वय 24, रा. वेल्हाळे रोड, संगमनेर), निखील ऊर्फ अजय विजय वाल्हेकर (वय 19, रा. वेल्हाळे रोड) व सागर बाळू गायकवाड (वय 19, रा. साठेनगर, घुलेवाडी) या तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे गुन्ह्यासंबंधी चौकशी केली असता त्यांनी त्यांचे पसार असलेले साथीदार अक्षय सावन तामचीकर (रा. भाटनगर, घुलेवाडी), शुभम ऊर्फ पप्पु बाळू गायकवाड (रा. साठेनगर, घुलेवाडी), मयुर राखपसरे (रा. म्हसोबानगर, घुलेवाडी) यांच्यासोबत केला असून गुन्ह्यातील चोरुन नेलेला मुद्देमाल हा भंगार खरेदी विक्री करणारी महिला शाहीन अब्दुल अली खान (रा. इदगाह, मैदानाजवळ, संगमनेर) व अफजल अहमद शेख (रा. विजयनगर, कुरणरोड, संगमनेर) यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमाल विकत घेणार्‍यांना ताब्यात घेऊन विचारपुस करुन एकूण 7 लाख 25 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला व अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सचिन अडबल, रविंद्र कर्डीले, भाग्यश्री भिटे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, आकाश काळे, अमृत आढाव यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या