Wednesday, April 29, 2026
HomeनगरPathardi : घुमटवाडी येथे गुप्तधनासाठी अघोरी प्रकार

Pathardi : घुमटवाडी येथे गुप्तधनासाठी अघोरी प्रकार

बुजवलेल्या खड्ड्यावर लिंबू, गुलाल, हार, नारळ || नरबळीची अफवा, पोलिसांनी जेसीबीने उकरला खड्डा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील घुमटवाडी येथील पुरातन नाथ संप्रदायाचे जागृत देवस्थान असलेल्या श्री गहिनीनाथ देवस्थान जवळ शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री एका मोठ्या संशयास्पद खड्ड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. खड्ड्याचा आकार कबरीसारखा असल्याने ग्रामस्थांनी नरबळी देऊन कोणाला तरी पुरले असावे, अशी भीती व्यक्त केली. गुप्तधनाच्या शोधात अनोळखी व्यक्तींकडून हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा गावभर पसरली.

- Advertisement -

घुमटवाडी गावापासून अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर डोंगर उतारावरील गहिनीनाथ देवस्थान हे शेकडो वर्षांपूर्वीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे मोठे भुयार असून, ते मायंबा येथील मच्छिंद्रनाथ आणि श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानाशी जोडलेले असल्याची आख्यायिका आहे. या भुयार मार्गात मोठे गुप्तधन पुरलेले असल्याची अनेक वर्षांपासूनची लोककथा ग्रामस्थ सांगतात. यापूर्वीही असे प्रकार घडल्याच्या बातम्या गावात रंगतात. यावेळी खड्डा खोदल्यानंतर तो पुन्हा माती टाकून बुजवण्यात आला होता. खड्ड्यावर लिंबू, गुलाल, हार, नारळ आणि बाहुली यांसारखे पूजेचे साहित्य आढळून आल्याने संशय अधिक बळावला. हा खड्डा गहिनीनाथ मंदिराजवळील महाकालेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या भुयाराजवळ खोदण्यात आला होता.

ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार रविवारी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. सोमवारी जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण खड्डा उकरून तपासण्यात आला. मात्र त्यात कोणत्याही संशयास्पद वस्तू, अवशेष किंवा मानवी देह आढळून आला नाही. पोलीस उपनिरीक्षक साहेबराव चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही किंवा गुन्हा नोंदवलेला नाही.

लालसेमुळे पूर्वीही…
गुप्तधनाच्या लालसेने अंधारात असे प्रकार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जण म्हणतात, भुयार आणि गुप्तधनाच्या अफवांमुळे अनोळखी लोक येऊन असे प्रयोग करतात. पूर्वीही असे प्रकार झाले आहेत. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अफवांना आळा बसला असला, तरी अंधश्रद्धा आणि गुप्तधनाच्या अफवांमुळे अशा घटना घडत असून या झालेला प्रकाराचा पोलिसांनी छडा लावावा अशी मागणी घुमटवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या संशयास्पद घटनांबाबत तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक होणे शेतकर्‍यांना पडले महागात!

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar राज्यात शासनामार्फत शेतकर्‍यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यात आल्या आहेत. मात्र, या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांत संचालक होणे शेतकर्‍यांना आता...