जुने नाशिक | प्रतिनिधी Nashik
द्वारका पासून अशोका मार्गाकडे जाणाऱ्या पखाल रोड वरील उस्मानिया चौकात प्राचीन, जुना महाकाय वृक्ष आज रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कोसळला. या वेळी रस्त्याने पायी जाणारी महिला जखमी झाली असून काही वाहनधारकांचे नुकसान झाल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत इतर जीवितहानी झाली नाही, दरम्यान या वेळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
वृक्ष कोसळताच परिसरातील बत्ती गुल झाली होती तर वृक्ष मुख्य चौकात पडल्याने द्वारका, अशोका मार्ग, काठे गल्ली सिग्नल, तसेच नागजी अशफाकउल्लाह चौक, मोहम्मद अली रोड हे मार्ग बंद पडले होते. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक तरुणांनी त्वरित बचाव कार्य सुरू केले होते. सदर घटने बाबत पोलीस व महापालिकेच्या अग्निशामक विभागाला कळविण्यात आले.
काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सध्या वृक्ष हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान शहरातील धोकादायक झालेले जुने वृक्ष याकडे मनपाने लक्ष देऊन त्याचा निर्णय घ्यावा , जेणेकरून नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.