ठाणे | Thane
भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता महायुतीचा खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरीश महाजन यांनी काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सत्तास्थापनेत जो पेच निर्माण झाला आहे, त्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आज तरी ही सत्तास्थापनेची कोंडी फुटेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गिरीश महाजन यांनी घेतली शिंदेंची भेट
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट जवळपास सव्वा तास चालली. या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि शिंदेंच्या तब्येतीबाबत अपडेट दिली. मुख्यमंत्र्यांना व्हायरल झाला आहे आणि त्यांना तापही आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून सलाईन दिली जात आहे. ते लवकरच बरे होतील आणि ते पुन्हा कामकाजात सक्रिय होतील, असे महाजन म्हणाले.
गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून वेळ मागितला होता. पण, एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गेल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता, असेही महाजन म्हणाले. तसेच, आज फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. महायुतीमध्ये सर्व ठीक आहे आणि कुठलाही मतभेद नाही, असेही ते म्हणाले.
भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना आता हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप आमदारांची विधिमंडळ नेता निवडण्यासाठी ४ डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. महायुतीत मंत्रिपदांचे व खातेवाटपाचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृह खात्यासह इतर काही महत्त्वाच्या खात्याची मागणी केली आहे. मात्र, भाजप गृहखात्यावरील दावा सोडण्यास तयार नाही. भाजपकडून शिवसेनेला नगरविकास आणि इतर काही खाती देण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्रीपद नसेल तर गृह खातं देण्याची आग्रही मागणी शिंदे यांनी केली असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरुन सत्ता वाटपाचा तिढा सुरू आहे.
भाजपकडून एकनाथ शिंदे यांना हवे असलेले गृहखाते दिले जाणार की नाही, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेला गृहखाते न दिल्यास भाजप एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून महायुती सरकारमध्ये कशाप्रकारे सामील करुन घेणार, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भाजपाच्या गटनेत्याची उद्या निवड
भाजपने निरीक्षक म्हणून नेमलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन या मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहे. यावेळी भाजप विधीमंडळ नेत्याच्या निवडीसाठी मुंबईत बैठक पार पडले. बुधवारी सकाळी १० वाजता विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडेल. यावेळी भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड होईल, असे सांगितले जात आहे. यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील.