Saturday, May 4, 2024
Homeजळगावजिल्ह्यासह राज्याची आरोग्य यंत्रणा रामभरोसे

जिल्ह्यासह राज्याची आरोग्य यंत्रणा रामभरोसे

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यासह राज्यात करोनाच्या रुग्णांचे अहवाल दहा दिवसांपासून प्रलंबित आहे. खासगीसह सरकारी रुग्णालयात बेड शिल्लक नाही.

- Advertisement -

मात्र तरी देखील शासनाकडून कुठलीही ठोस उपाय योजना केली जात नसल्याने जिल्ह्यासह राज्याची आरोग्य यंत्रणा वार्‍यावर असून सर्व कामकाज रामभरोसे असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री तथा आ. गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली.

कोरोनावर मात करुन जळगावात पोहचल्यानंतर आमदार गिरीश महाजन यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणी करुन आरोग्य यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला.

यावेळी त्यांनी सरकारसह आरोग्य यंत्रणेवर घणाघाती टीका केली.कोरोनामुळे राज्यासह जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे.

प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाला सुमारे 80 व्हेंटीलेटर प्राप्त झाले होते. परंतु आता त्यातील केवळ 38 ते 40 व्हेंटीलेटर सुरु असल्याने व्हेंटीलेटर अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे.

तसेच गेल्या 4 महिन्यांपासून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचे वेतन थकीत आहेत. अशी विदारक परिस्थितीत शासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने संपुर्ण आरोग्य यंत्रणेची व्यवस्था ढासळली असल्याचा आरोप आ. महाजन यांनी केला.

सरकारकडे गांभीर्याने बघायला वेळ नाही

जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असतांना सरकारमधील मंत्र्यांचे दुसरेच उद्योग सुरु आहेत. सरकाने जनतेला वार्‍यावर सोडून दिले आहे का? असा सवाल आता उपस्थित होवू लागला असून सरकारला या सर्वबाबींकडे गांभीर्याने बघायला वेळ नसल्याचे आ. महाजन यावेळी म्हणाले.

सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का ?

आधीच गारपीटमुळे शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. त्यातच महावितरणकडून विज कनेक्शन कट केले जात असून ट्रान्सफार्मर दिले जात नसल्याने शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत भयावह झाली आहे. प्रत्येक मंत्री वेगवेगळी भूमिका मांडत आहे. या सर्वबाबींचा शासनाला त्रास नक्कीच होणार. शासनाने अजून तरी डोकं ठिकाणावर ठेवून वीज कनेक्शनबाबत योग्य निर्णय घ्यावा. तसेच आ. मंगेश चव्हाण यांनी केलेल्या आंदोलनाचे आम्ही पुर्णपणे समर्थन करतो असेही आ. महाजन म्हणाले.

ईडीची तारीख आली की लगेच खडसेंना होतो करोना

मला कोरोना एकचवेळा झाला आहे. मी मुबंईतील सरकारी दवाखान्यातच दहा दिवस उपचार घेतले. माझे चार वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. मला ईडीची तारीख पाहून कोरोना होत नाही. जिल्ह्यातील नेते एकनाथ खडसेंना ईडीची तारीख आली की, लगेच त्यांना कोरोना होतो. ते लागलीच खासगी दवाखान्यात जातात किंंंवा घरीच क्वारंटाईन होतात आणि मुंबईला बाहेर फिरतात. मी खोटेनाटे सर्टीफिकेट जोडून कुठेही फिरत नाही. कोरोना हा तरुण किंवा पैलवानांना देखील होत आहे. त्यामुळे मला झालेला कोरोना हा ईडीचा कोरोना नाही असे म्हणत त्यांनी खडसेंवर निशाना साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या