Monday, May 27, 2024
Homeनगरकॉलेजला जाणार्‍या मुलीचा तीन दिवसांपासून पाठलाग

कॉलेजला जाणार्‍या मुलीचा तीन दिवसांपासून पाठलाग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी नगर शहरात कॉलेजसाठी आल्यानंतर तिचा गेल्या तीन दिवसांपासून पाठलाग करणार्‍या चार तरुणांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी शनिवारी (दि. 23) दुपारी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

करण बाळू मोढवे (रा. वाकोडी ता. नगर) व त्याच्या सोबतचे अनोळखी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुलगी नगर तालुक्यातील एका गावात राहत असून ती नगर शहरात एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ती गुरूवारी (दि. 21) दुपारी साडे बारा वाजता कॉलेजकडे जात असताना तिला चार दुचाकीवरून आलेल्या चौघा तरुणांनी रस्त्यात अडविले. काही वेळाने ते तरुण तेथून निघून गेले. घाबरलेली मुलगी कॉलेजला न जाता घरी गेली. शुक्रवारी (दि. 22) पुन्हा कॉलेजकडे जात असताना त्याच मुलांनी पुन्हा आडवून कॉलेजमध्ये व घरी कोणाला काही सांगितल्यास जिवंत मारून टाकण्याची धमकी दिली.

दरम्यान, मुलीने घरी सांगितल्यानंतर शनिवारी (दि. 23) सकाळी ती वडिलांना घेऊन आली. त्रास देणारे चारही मुले तिने तिच्या वडिलांना दाखविली. त्यांनी त्यातील एकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याचे कॉलेजचे ओखळपत्र हाती लागले. त्यावर मोढवे करण बाळू असा उल्लेख होता. त्यानंतर मुलीने वडिलांसह तोफखाना पोलीस ठाणे गाठून तीन दिवसांपासून होत असलेला प्रकार सांंगितला. पोलिसांनी तिघांवर विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या