संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीची याच महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी छेडछाड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सदर विद्यार्थ्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती असे की, शहरात राहणारी ही विद्यार्थीनी एका महाविद्यालया प्रथम वर्ष शास्त्र वर्गात शिक्षण घेत आहे. सदर महाविद्यालयात अन्य शाखेत शिक्षण घेणारा विद्यार्थी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कॉलेजमध्ये सुट्टी झाल्यावर सदर मुली सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता.
परंतु ती या मुलासोबत बोलत नव्हती. दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सदर मुलगी महाविद्यालयात असताना या विद्यार्थ्याने तिचा पाठलाग केला. माझ्याशी का बोलत नाही. तु माझ्याशी बोलली नाहीतर, तुझ्या चेहर्यावर अॅसिड टाकेल, माझ्याशी तू रिलेशनमध्ये नाही आली तर तुझ्यावर अत्याचार करेन अशी धमकी दिली. त्याच्या धमकीला घाबरून दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सात वाजता सदर मुलगी तिच्या बहिणीला सोबत घेऊन त्याला समजावण्यासाठी एका कॅफेमध्ये गेले. दोन्ही बहिणींनी या तरुणास समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याने काहीही ऐकून न घेता कॅफेच्या बाहेर येऊन तू माझी नाही झाली तर तुला कोणाची होऊ देणार नाही. असे म्हणून माझा हात धरुन माझे कपडे ओढून असभ्य कृत्य केले व जिवे मारण्याची धमकी दिली. तु माझी नाही झाली तर मी आत्महत्या करुन घेईल अशी धमकी त्याने दिली. या दोघी बहिणी नंतर घरी गेल्या त्यांनी घडलेला प्रकार दिनांक 14 रोजी त्यांच्या घरी सांगितला.यानंतर पीडित मुलीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी कोतूळ येथील तरुणाविरुद्ध पोस्कोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.