अहमदनगर (प्रतिनिधी) – दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी करावे तसेच सीआयडीने तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात गिरवले यांना त्यांच्या माळीवाड्यातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली होती. कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास पुढे सीआयडीकडे करत आहे. पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला असून संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी असलेली याचिका त्यांच्या पत्नी निर्मला गिरवले यांनी दाखल केली होती. त्यावर सोमवारी (दि. 9 डिसेंबर) सुनावणी झाली.
गिरवले यांच्यावतीने अॅड. नितीन गवारे काम पहात आहेत. कैलास गिरवले यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्यात कोण-कोण दोषी आहेत, कोणा-कोणाचे जबाब नोंदविले, सीसीटीव्ही फुटेज जप्त केले का, या अनुषंगाने न्यायालयाने सीआयडीकडून तपासाचा अहवाल मागितला आहे. तसेच त्या सोबत प्रतिज्ञापत्र देण्याचेही आदेशात म्हटले आहे.
गिरवले यांना मारहाण प्रकरणात ज्या पोलिसांचा संबंध असेल त्यांना प्रतिवादी करण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याने पोलीस अडचणीत येण्यासी शक्यता आहे. न्यायाधीश एम. जी. शिवलकर आणि न्या. टी. एन. नलावडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी आता 6 जानेवारीला होणार आहे.
12