अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर पाण्यासाठी वेटरला मोठ्याने आवाज दिला या कारणावरून शेजारी बसलेल्या तरुणास राग आल्याने त्याने एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. ही घटना चितळे रस्त्यावरील पिंगारा हॉटेल येथे घडली. संजय राजेंद्र परदेशी (वय 26 रा. मंगलगेट, जे. जे. गल्ली, अहिल्यानगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय आडेप (रा. तोफखाना) व त्याच्या दोन मित्रांविरूध्द (नाव, पत्ता नाही) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे त्यांचेे मित्र अमित कैलास सुरसे यांच्यासह पिंगारा हॉटेल येथे जेवण करायला गेले होते. जेवण करून झाल्यावर त्यांनी हॉटेलच्या वेटरला आवाज दिला व पाणी मागितले. तेव्हा त्यांच्या बाजूचे टेबलला जेवण करत असलेला अक्षय आडेप याला राग आला. त्याने शिवीगाळ करून टेबलवर असणारी काचेची दारूची बाटली फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारली. तेव्हा सुरसे याने फिर्यादीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता अक्षय व त्याच्या दोन अनोळखी मित्राने दोघांनाही मारहाण केली. तुम्हा दोघांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या भांडणात परदेशी याच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.