अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कांदा, द्राक्ष, केळी आणि डाळिंबासह अन्य सेंद्रीय फळ पिकांच्या उत्पादनात नगर जिल्हा प्रगती करतांना दिसत आहे. विषमुक्त आणि सेंद्रीय शेतद्वारे उत्पादित केलेली पिके, फळांना जागतिक बाजारपेठ मिळावी, यासाठी जिल्ह्यातील 12 हजार 726 शेतकर्यांनी केंद्रच्या हॉर्टीनेट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. या ठिकाणी नोंदणी केलेल्या फळपिकांची निर्याती करता येते आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील 350 हून शेतकर्यांचा केशर आंबा युरोपियन आणि अमेरिकेच्या विविध प्रांतात जाण्यासाठी सज्ज होतांना दिसत आहे.
नगर जिल्हा ऊसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात फळबागाचे प्रमाण वाढत आहे. सुरूवातीला डाळींब, संत्रा या फळ पिकांकडे शेतकर्यांचा ओढा अधिक होता. मात्र, डाळींबला फवारणीचा खर्च अधिक असल्याने शेतकर्यांनी द्राक्ष, केळी आणि आंबा बागाकडे मोर्चा वळला आहे. नगर जिल्ह्यातील वातावरण हे संमिश्र आणि उष्ण असल्याने फळबागांसाठी पोषक आहे. येथील पाणी, माती आणि वातावरणामुळे गुणवत्तापूर्ण फळ येतात. यामुळे अलिकडे जिल्ह्यात फळबागाचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. विशेष करून सेंद्रीय पध्दतीने द्राक्ष, आंबा, डाळींब, कांदा, नागणीचे पान (खायचे पान) याचे उत्पादन वाढत आहे.
या फळपिकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून हॉर्टीनेट ऑनलाईन व्यासपिठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्राच्या अपेडा यांच्यावतीने ही प्रणाली चालवण्यात येत असून त्या ठिकाणी निर्यातक्षम कांदा, द्राक्ष, आंबा, डाळींब, अन्य फळे, बिटल (नागीणीचे पाने) या सेंद्रीय पध्दतीने उत्पादित केलेल्या फळांची माहिती नोंदवण्यात येत आहे. या ठिकाणी नोंदणी असणारे शेतकर्यांची फळे ही जागतिक बाजारपेठेत पाठवण्यात येतात.
यात निर्यातक्षम आंबा फळाची निर्यात करण्यासाठी ग्रेपनेटे, मँगोनेट, अनारनेट, सिट्रसनेट (लिंबू, संत्री, मोसंबी), ओनिनयनेट, ऑदरनेट आणि बिटलनेट या फळांची नोंदणी करण्यासाठी हॉर्टीनेट ही ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. जिल्ह्यात 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 12 हजार 276 शेतकर्यांनी या प्रणालीत नोंदणी केलेली आहे. यात 9 हजार 810 शेतकर्यांच्या 614 हेक्टर द्राक्ष, 342 शेतकर्यांची 350 हेक्टवर आंबा, 3 हजार 680 शेतकर्यांचे 2 हजार 364 हेक्टरवर डाळींब, 191 शेतकर्यांचे 375 अन्य फळे, 135 शेतकर्यांचे 200 हेक्टवर सिट्रसनेट, 7 हजार 104 शेतकर्यांचे 5 हजार 541 हेक्टर, 17 शेतकर्यांचे 3 हेक्टवर बिलनेट या प्रणालीवर नोंदणी केलेली आहे. यंदा नगर जिल्ह्यातून केशर जातीचा 500 टन आंबा युरोपियन, अमेरिका आणि सौदीमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. मागील वर्षी हे प्रमाण हे 300 टन होते. यंदा त्यात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हॉर्टीनेटवर नोंदणी केलेले शेतकरी
नगर 1543 आणि 1 हजार 423 हेक्टर, पारनेर 2289 आणि 1 हजार 604 हेक्टर, पाथर्डी 754 आणि 455 हेक्टर, कर्जत 723 आणि 476 हेक्टर, जामखेड 463 आणि 258 हेक्टर, श्रीगोंदा 1420 आणि 936 हेक्टर, श्रीरामपूर 307 आणि 266 हेक्टर, राहुरी 554 आणि 434 हेक्टर, नेवासा 705 आणि 503 हेक्टर, शेवगाव 722 आणि 477 हेक्टर, संगमनेर 859 आणि 511 हेक्टर, अकोले 544 आणि 335 हेक्टर, कोपरगाव 1339 आणि 1 हजार 244 हेक्टर, राहाता 504 आणि 336 हेक्टर.