अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली गोवा राज्य बनावट विदेशी दारू अवैधरीत्या वाहतूक करणार्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान दारू व एक चारचाकी वाहन असा 13 लाख सहा हजार 900 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील वाळुंज फाटा, बायपास रेल्वे पुलाखाली भरारी पथक क्र. 1, अहिल्यानगर विभागाने रविवारी (30 मार्च) ही कारवाई केली. अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक प्रवीण तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. 1 यांनी अवैधरीत्या वाहतूक होत असलेल्या विदेशी मद्य साठ्यावर छापा टाकला. या कारवाईत एकूण 302.4 ब.ली (35 बॉक्स) विदेशी दारूसह चारचाकी वाहन आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत 13 लाख सहा हजार 900 रूपये एवढी आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई निरीक्षक एस. आर. कुसळे, सहायक दुय्यम निरीक्षक व्ही. एन. रानमाळकर तसेच जवान सुरज पवार, देवदत्त कदरे, चतुर पाटोळे, दीपक बर्डे, सिध्दांत गिरीगोसावी आणि महिला जवान सुनंदा अकोलकर यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.